नागपुरात कार चालकाच्या हत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 23:17 IST2021-05-13T23:15:39+5:302021-05-13T23:17:10+5:30
Attempted murder of car driver एमआयडीसीतील राजीवनगरात राहणाऱ्या एका वाहन चालकाची हत्या करण्याचा प्रयत्न झाला.

नागपुरात कार चालकाच्या हत्येचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमआयडीसीतील राजीवनगरात राहणाऱ्या एका वाहन चालकाची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. आरोपींनी धारदार शस्त्राने गळ्यावर वार केल्यामुळे
सम्राट विजयसिंह हा ३३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर काही जण बेपत्ता झाल्याने त्यांच्यावर संशयाची सुई वळली आहे.
राजीवनगर, झेंडा चौक येथील रहिवासी विजय विश्वनाथ सिंह (७२) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा सम्राट कार चालक आहे. २ मेच्या रात्री सम्राट त्याचा मित्र प्रदीप सिंह ऊर्फ बच्चा सिंहसोबत एका रूममध्ये झोपला होता. मध्यरात्रीनंतर काही अज्ञात आरोपींनी सम्राटवर शस्त्राने हल्ला चढवला. त्याच्या गळ्यावर वार करण्यात आल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती कळताच एमआयडीसीचे ठाणेदार युवराज हांडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, जखमीला रुग्णालयात पाठविण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेपासून सम्राटचा मित्र बच्चा तसेच अन्य काही संशयित बेपत्ता झाले. त्यामुळे त्यांनी हा गुन्हा केला असावा, असा संशय आहे. या प्रकरणात हत्या करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.