नागपुरात कारमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:53 IST2019-02-15T00:52:19+5:302019-02-15T00:53:20+5:30
शहरातील तीन प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी कारमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार घेऊन एक महिला जरीपटका ठाण्यात गुरुवारी सायंकाळी धडकली. तिने घेतलेली नावे पाहून पोलिसांचीही काही वेळेसाठी भंबेरी उडाली. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता.

नागपुरात कारमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील तीन प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी कारमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार घेऊन एक महिला जरीपटका ठाण्यात गुरुवारी सायंकाळी धडकली. तिने घेतलेली नावे पाहून पोलिसांचीही काही वेळेसाठी भंबेरी उडाली. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता.
पीडित महिला सदरमध्ये राहते तर, तिचा व्यापारी मित्र कडबी चौकात राहतो. त्याचे धंतोलीत कॉम्प्युटर, लॅपटॉपचे शोरूम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी आणि महिलेची मैत्री आहे. गेल्या काही दिवसांपासून या मैत्रीत दुसऱ्या काही महिला शिरल्याने महिला व्यथित झाली असून, त्यावरून या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री सदर महिला व्यापाऱ्याच्या घरी धडकली. त्यांच्यात यावेळी कडाक्याचा वाद झाला. त्यानंतर व्यापारी महिलेला त्याच्या कारमध्ये घेऊन गेला. चर्चा करण्याच्या बहाण्याने त्याने आपल्या दोन मित्रांना तेथे बोलावून घेतले. या तिघांनी कारमध्येच बलात्कार केल्याचा प्रयत्न केला. मात्र, कशीबशी सुटका करून घेत आपण तेथून घरी पोहचल्याचे आणि आता थोडी सावरल्यामुळे तक्रार द्यायला आल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तिने घेतलेली नावे ‘वजनदार’असल्यामुळे पोलिसांनी तिची तक्रार चौकशीत ठेवली. यासंबंधाने रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे जरीपटका पोलिसांनी टाळले. एवढेच नव्हे तर वारंवार फोन करूनही जरीपटका पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला नाही.