उसने दिलेले पैसे मागितले म्हणून तलवारीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:06 IST2021-04-18T04:06:50+5:302021-04-18T04:06:50+5:30

इडली विक्रेता गंभीर जखमी : कळमन्यातील घटना लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून दोन ...

Attacked with a sword as he demanded money | उसने दिलेले पैसे मागितले म्हणून तलवारीने हल्ला

उसने दिलेले पैसे मागितले म्हणून तलवारीने हल्ला

इडली विक्रेता गंभीर जखमी : कळमन्यातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून दोन गुंडांनी एका इडली विक्रेत्यावर तलवारीने हल्ला चढवून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. संतोष ऊर्फ कुबड्या यादव आणि सुमित ऊर्फ बबुवा यादव अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही गुलशननगरात राहतात. फिर्यादी चेतन उमेदराम शाहू (३५) वनदेवीनगरात राहतात. ते विटा भट्टी चौकात इडली सांबारचा ठेला लावतात. शाहूने काही दिवसांपूर्वी आरोपी कुबड्या यादवला पैसे उसने दिले होते. हे पैसे परत करण्यास आरोपी टाळाटाळ करीत होता. शुक्रवारी दुपारी ४च्या सुमारास गुलशननगरातील चेतन आणि आरोपी कुबड्या तसेच बबुवाची भेट झाली. शाहूने कुबड्याला आपले पैसे परत मागितले. त्यावरून बाचाबाची झाल्यानंतर आरोपी कुबड्या आणि बाबू यांनी चेतनला शिवीगाळ करून आधी मारहाण केली. नंतर तलवारीने त्याच्या डोक्यावर आणि हातावर वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेले. जखमी शाहूला कमाल चौकातील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याने दिलेल्या माहितीवरून कळमना पोलिसांनी आरोपी कुबड्या तसेच बबुवा यादव या दोघांविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

---

Web Title: Attacked with a sword as he demanded money