Ativrushti Nuksan Bharpai : नागपूर विभागात ४२ हजार हेक्टरवरील पीक मातीमोल ! नुकसान भरपाई मागणीच्या अर्धी पण नाही
By निशांत वानखेडे | Updated: September 22, 2025 20:34 IST2025-09-22T20:32:24+5:302025-09-22T20:34:43+5:30
मागणी ३७ काेटीची, मंजुरी १३ काेटी : चंद्रपूरला सर्वाधिक फटका, १४ हजार हेक्टर बाधित

Crops on 42 thousand hectares in Nagpur division have been sold at a loss! Not even half of the compensation demanded
नागपूर : जून महिना काेरडा गेला असला तरी जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना माेठा फटका बसला आहे. सरकारी आकडेवारीनुसार ऑगस्टपर्यंत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात ४२,६०० हेक्टरमधील पिकांचा चिखल झाला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ३७.७० काेटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाकडे सप्टेंबर महिन्याचे पंचनामे अद्याप सुरू आहेत.
यावर्षी विभागातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस नाेंदविला गेला आहे. जुलैच्या सुरुवातीला वेळेवर पाऊस न झाल्याने काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाचाही सामना करावा लागला. त्यानंतर मात्र धाे-धाे सरी बरसल्या. ठराविक काळात झालेल्या पावसाने बहुतेक जिल्ह्यात पुर परिस्थिती निर्माण झाली. जुलै व ऑगस्टमध्येही मुसळधार पावसाने थैमान घातले. गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्यात पिकांना सर्वाधिक फटका बसला. शासकीय आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात १४,१०५.७४ हेक्टरमधील पिकांना फटका बसला, तर गडचिराेलीत १०,९१२.७३ हेक्टरमध्ये पिकांची नासाडी झाली. याशिवाय वर्ध्यात ९०९१.३९ हेक्टर, गाेंदिया २५८.३२ हेक्टर, नागपूर ५६४४ हेक्टर व भंडारा जिल्ह्यात २५८९.१२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
बाधित क्षेत्राचे पंचनामे करून प्रशासनाने ३७.७० काेटी रुपयांचे नुकसान भरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. त्यातील आतापर्यंत १३.५६ काेटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्याचे पंचनामे प्रशासनाकडून केले जात आहेत.
जिल्हानिहाय झालेले नुकसान व मागणी
जिल्हा बाधित क्षेत्र (हेक्टर) मागणी (काेटी) मंजूर
नागपूर ५६४४.०१ ४.९० ३९२.९२
वर्धा ९०९१.३९ ८.०१ २३०.६७
चंद्रपूर १४,१०५.७४ ७.३३ ७.३३
गडचिराेली १०,९१२.७३ १२.९० ००
गाेंदिया २५८.३२ २.३४ ००
भंडारा २५८९.१२ ४.३३ ००
या पिकांना बसला फटका
विभागातील जिल्ह्यात भात पिकासह साेयाबिन, कापूस, मिरची व संत्रा माेसंबीची शेती केली जाते. भंडारा, चंद्रपूर, गडचिराेली, गाेंदिया जिल्ह्यात पुरामुळे जमिन खरडून गेली व धान, साेयाबिन, कापूस पिकाला माेठा फटका बसला आहे. वर्धा जिल्ह्यात कापसाचे माेठे नुकसान झाले. नागपूर जिल्ह्यात धान, साेयाबिनसह संत्रा, माेसंबी आणि मिरची पिकाची नासाडी झाली आहे.