सुमेध वाघमारे नागपूर : पावसाळ्यातील दमट हवा आणि हिवाळ्यातील धुक्यामुळे श्वसनविकार वाढतात, हे सर्वश्रुत आहे. उन्हाळ्यात मात्र या रुग्णांना काहीसा आराम मिळतो, असा समज होता. परंतु नागपूर शहरात सुरू असलेल्या सिमेंटची रस्ते, उड्डाण पूल, इमारतीचे बांधकाम, वाहनातील धूर शिवाय, वातावरणातील अचानक बदलांमुळे अस्थमा अर्थात दम्याच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. ज्येष्ठ श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी केलेल्या निरीक्षणात, ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नागपूर शहराचा विकास वेगाने होत आहे. नवीन सिमेंटचे रस्ते आणि मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामामुळे ज्या नागरिकांना आधीपासूनच श्वसनाचे विकार आहेत, त्यांच्यात या विकारांची लक्षणे अधिक तीव्रतेने जाणवत आहेत, असे मत क्रिम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. अरबट यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, उन्हाळा हा श्वसनविकार असलेल्या रुग्णांसाठी 'हेल्दी सीझन' मानला जातो. मात्र, सध्याच्या प्रदूषणामुळे श्वसनाच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक रुग्ण सततचा खोकला, वाढलेला दमा आणि क्रॉनिक आॅब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) यांसारख्या समस्यांसाठी दवाखान्यात येत आहेत, ही निश्चितच चिंतेची बाब आहे.
१६ टक्क्याने वाढले रुग्णडॉ. अरबट यांनी आकडेवारी देत सांगितले की, २०२३ च्या उन्हाळ्यात हॉस्पिटलमध्ये श्वसनविकाराचे सुमारे २४८७ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंतच ही संख्या १६.७१ टक्क्यांनी वाढून २,९८६ वर पोहोचली आहे.
सूक्ष्म धूळ फुफ्फुसाच्या आत सिमेंटच्या कामांमुळे हवेत उडणारी सूक्ष्म धूळ फुफ्फुसांच्या आतपर्यंत जाते. यामुळे सततचा खोकला, घसा खवखवणे, दमा, ब्रॉन्कायटिस आणि हृदयविकारांसारख्या समस्या वाढतात. सिमेंटच्या पृष्ठभागामुळे शहरात उष्णता अधिक काळ टिकून राहते, ज्यामुळे स्थानिक तापमान २ ते ३ अंश सेल्सियसने वाढते आणि उष्णतेशी संबंधित आजार वाढतात. तसेच, सिमेंटमुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरल्याने पुराचा धोकाही वाढतो.
एअर क्वालिटी इंडेक्स पोहचला १२८ पर्यंत बांधकामातून हवेत मिसळणारी सिलीका आणि फ्लाय अॅश लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींसाठी धोकादायक ठरत आहे. नागपूरचा सध्याचा एअर क्वालिटी इंडेक्स (पीएम१०) १२८ पर्यंत पोहोचला आहे, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. या हवेत श्वास घेणे म्हणजे दिवसाला जवळपास दोन सिगारेट ओढण्याइतके धोकादायक आहे.
प्रदूषण नियंत्रण आणि हिरवळ वाढवणे गरजेचेवाढत्या प्रदूषणाची दखल प्रशासनाने घेणे आता अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बांधकामादरम्यान प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाºया ठेकेदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने कठोर धूळ आणि उत्सर्जनावर नियंत्रण मिळवणे, शहरात हिरवळीचे क्षेत्र वाढवणे आणि नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. वायू गुणवत्ता सुधारणे ही केवळ तांत्रिक बाब नसून, नागपूरच्या सुरक्षित भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.- डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसन विकार तज्ज्ञ