जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By दयानंद पाईकराव | Updated: June 8, 2023 16:30 IST2023-06-08T16:30:00+5:302023-06-08T16:30:36+5:30
आरोपीस अटक : आठ महिन्यांपासून करीत होता शोषण

जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार
नागपूर : जीवे मारण्याची धमकी देऊन सलग आठ महिने एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे शोषण करणाऱ्या आरोपीस हिंगणा पोलिसांनी अटक केली आहे.
सुमीत सोमलाल मडावी (वय २०, रा. हिंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो बकºया चारण्याचे काम करतो. हिंगणा तालुक्यातील एका गावात आरोपी आणि मुलगी राहतात. मुलगी अकरावी उत्तीर्ण होऊन बारावीला गेली आहे. २६ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी दोन ते १५ मे २०२३ ला दुपारी ४ दरम्यान आरोपीने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित करून तिचे शोषण केले. याबाबत कोणाला काही सांगितल्यास आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपी सुमितच्या धमकीला घाबरून अल्पवयीन मुलीने याबाबत कोणालाही सांगितले नाही. परंतु आरोपीचा अत्याचार सहन न झाल्यामुळे अल्पवयीन मुलीने मंगळवारी ६ जूनला आपल्या वडिलांना घटनेची माहिती दिली. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगणाचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघ यांनी आरोपी सुमीत विरुद्ध कलम ३७६ (२) (१) (एन), ५०६ (ब), सहकलम ४, ६, पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपी सुमितला अटक केली आहे. पुढील तपास हिंगणा पोलिस करीत आहेत.