आशीष देशमुख दुसऱ्यांदा भाजपमध्ये जाणार; १८ जून रोजी गडकरी, फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश
By कमलेश वानखेडे | Updated: June 14, 2023 19:54 IST2023-06-14T19:53:47+5:302023-06-14T19:54:04+5:30
माजी आमदार आशीष देशमुख हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

आशीष देशमुख दुसऱ्यांदा भाजपमध्ये जाणार; १८ जून रोजी गडकरी, फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश
नागपूर : माजी आमदार आशीष देशमुख हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी १८ जून रोजीचा मूहुर्त निश्चित झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कोराडी येथील नैवेद्यम नॉर्थस्टार सभागृहात प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. देशमुख हे २००९ मध्ये सावनेर विधानसभेत भाजपकडून पराभूत झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये ते काटोलमधून भाजपच्या तिकीटावर विजयी झाले.
पण भाजपच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला व काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले होते. नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सल्ला देणे व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे देशमुख यांना काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने पक्षातून निष्काषित केले. त्यानंतर देशमुख यांनी भाजपशी जवळिक वाढविली. फडणवीस व बावनकुळे हे देशमुख यांच्या घरी जाऊन आले. तेव्हाच देशमुख यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. शेवटी १८ जूनचा मूहुर्त निघाला.