दोन महिन्यांपासून होता फरार :दोन दिवसांचा पीसीआर नागपूर : अर्थव्यवस्थेला आव्हान देऊ पाहणाऱ्या डब्बा ट्रेडिंग प्रकरणातील फरार आरोपी आशिष मुकुंद बजाज (वय ३५) याच्या मुसक्या बांधण्यात अखेर पोलिसांनी यश मिळवले. सोमवारी सकाळी त्याला अटक करून गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याची दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. बजाजमुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या १२ झाली आहे. मात्र, मुख्य सूत्रधार रवी अग्रवाल आणि वीणा सारडा अद्याप फरारच आहे. १२ मे रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने उपराजधानीतील विविध ठिकाणी एकाच वेळी धाडी घालून हजारो कोटींच्या सट्टेबाजीचा डब्बा व्यापार उघडकीस आणला होता. लकडगंजच्या शास्त्रीनगरमधील हनीऋतिका अपार्टमेट बजाजच्या कार्यालयातही डब्बा ट्रेडिंगच्या नावाखाली सट्टेबाजी केली जात असल्याचे उघड झाले होते. त्यावेळी पोलिसांनी ११ जणांना अटक केली तर, मुख्य सूत्रधार रवी अग्रवाल, वीणा सारडासह १० आरोपी फरार झाले होते. त्यात आशिष बजाजचाही समावेश होता.
डब्बा प्रकरणात आशिष बजाजला अटक
By admin | Updated: July 19, 2016 02:50 IST