सिकलसेलला आळा घालण्यासाठी ‘अरुणोदय’ मोहीम; नागपूर जिल्ह्यात ० ते ४० वयोगटाची व्यापक तपासणी
By सुमेध वाघमार | Updated: January 14, 2026 19:06 IST2026-01-14T19:04:58+5:302026-01-14T19:06:37+5:30
Nagpur : सिकलसेल हा अनुवांशिक रक्तदोष असला, तरी योग्य वेळी तपासणी, समुपदेशन आणि जनजागृतीद्वारे हा आजार भावी पिढीत जाण्यापासून रोखता येतो.

'Arunodaya' campaign to curb sickle cell; Comprehensive screening of 0 to 40 age group in Nagpur district
सुमेध वाघमारे
नागपूर : सिकलसेल हा अनुवांशिक रक्तदोष असला, तरी योग्य वेळी तपासणी, समुपदेशन आणि जनजागृतीद्वारे हा आजार भावी पिढीत जाण्यापासून रोखता येतो. याच उद्देशाने नागपूर जिल्ह्यात ‘अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया’ हे व्यापक व लक्ष केंद्रीत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ० ते ४० वयोगटातील नागरिकांची मोफत तपासणी, उपचार व जनजागृती केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या नियंत्रणाखाली हे अभियान राबवले जाणार असून, जिल्हा आरोग्य यंत्रणा यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. मोहिमेअंतर्गत संशयित रुग्णांची प्राथमिक तपासणी, अत्यंत अचूक मानली जाणारी ‘एचपीएलसी’ चाचणी, मोफत औषधोपचार तसेच विवाहपूर्व आणि प्रसूतीपूर्व समुपदेशनावर विशेष भर देण्यात येणार आहे.
‘सिकलसेल कुंडली’ जुळवा, पिढी वाचवा
भावी पिढी सिकलसेलमुक्त राहावी यासाठी विवाहापूर्वी तरुण-तरुणींनी सिकलसेल तपासणी करून आपली ‘सिकलसेल कुंडली’ जुळवावी, असे स्पष्ट आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. चुकीच्या माहितीअभावी किंवा अज्ञानामुळे हा आजार पुढे जातो, ही साखळी तोडणे हेच या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
स्थानिक भाषांतून व्यापक जनजागृती
आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे संदेश पोहोचावा यासाठी गोंडी व इतर स्थानिक बोलीभाषांमध्ये जनजागृती संदेश, आॅडिओ क्लिप्स, बॅनर्स आणि फलकांचा वापर केला जाणार आहे. शाळा, महाविद्यालये व आश्रमशाळांमध्ये प्रभातफेरी, प्रश्नमंजुषा, रांगोळी व निबंध स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर दवंडी व मायकिंगद्वारेही माहिती दिली जाईल.
यात्रा, उत्सवांमध्येही तपासणी
"मोहिमेच्या कालावधीत होणाºया स्थानिक सण, यात्रा व धार्मिक उत्सवांच्या ठिकाणी विशेष स्क्रीनिंग स्टॉल्स उभारले जाणार असून, नागरिकांची जागेवरच तपासणी केली जाणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी, आशा स्वयंसेविका, एएनएम आणि स्वयंसेवक यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सिकलसेलविषयी जनजागृती केली जाणार आहे. या अभियानात लोकप्रतिनिधी, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे."
- डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी