राष्ट्रवादी कार्यालयात लावणी अन् पदाधिकाऱ्यांना फटाके; सुनील तटकरेंची नागपूर शहराध्यक्षांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 06:17 IST2025-10-28T06:16:59+5:302025-10-28T06:17:50+5:30
पक्ष कार्यालयातील लावणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

राष्ट्रवादी कार्यालयात लावणी अन् पदाधिकाऱ्यांना फटाके; सुनील तटकरेंची नागपूर शहराध्यक्षांना नोटीस
नागपूर :राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नागपुरातील गणेशपेठ येथील कार्यालयात आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमात कलाकार असलेल्या एका कार्यकर्तीने लावणी सादर केली. पक्ष कार्यालयातील लावणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. चौफेर टीकेची झोड उठली. याची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गंभीर दखल घेतली. नागपूर शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांना नोटीस जारी करीत याप्रकरणी सात दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. एकीकडे शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आणि दुसरीकडे अजितदादांच्या पक्षाच्या कार्यालयात बघा कसे ठुमके घेतले जात आहेत, अशी टीका सोशल मीडियावर उमटली.
मी लावणी आर्टिस्ट आहे. सगळीकडे लावणी सादर करते. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जुळली आहे. पक्षाच्या दिवाळी मिलन कार्यक्रमात ज्या महिलांना गाणे म्हणता येत होते त्यांनी गाणे गायिले. काही पुरुषांनी डान्स केला. पक्षातील काही महिला पदाधिकाऱ्यांनी मला विनंती केली असता मी लावणी सादर केली. हा पक्षांतर्गत सोहळा होता. यात चुकीचे काहीच घडले नाही- शिल्पा शाहीद, लावणी कलाकार