मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयांची समिती नेमून चौकशी करा

By कमलेश वानखेडे | Updated: January 21, 2025 15:13 IST2025-01-21T15:12:24+5:302025-01-21T15:13:03+5:30

विजय वडेट्टीवार यांची मागणी : हा तर भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न

Appoint a committee to investigate the decisions taken by Munde. | मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयांची समिती नेमून चौकशी करा

Appoint a committee to investigate the decisions taken by Munde.

कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :
राज्यातील एक रुपया पीक विमा बंद करण्याची शिफारस सरकारला करण्यात आली आहे. या योजनेत ३५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कृषी खात्यात भ्रष्टाचाराचा हा बीड पॅटर्न झाला असून धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केली.

वडेट्टीवार म्हणाले, महायुती सरकारने एक रुपयात पीक विमा ही योजना आणली होती, त्यावरून आपली पाठ थोपटून बीड पॅटर्नचा गवगवा केला होता. पण या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने राज्य सरकारला ही योजना बंद करण्याची शिफारस केली असल्याचे समजते. विशेषत या योजनेत शेतकऱ्यांच्या नावे बोगस अर्ज केल्याची प्रकरण समोर आल्यानंतर ही शिफारस करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२४ मध्ये एकूण चार लाख अर्ज बोगस निघाले त्यातील एक लाखाहून अधिक अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यात आढळले आहे , ही धक्कादायक बाब आहे. त्यामुळे हा तर भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न असल्याची टीका काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

मुंडेंनी खरेदीचे धोरण बदलले
कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी कृषी साहित्याचे खरेदीचे धोरण बदलले होते. त्याबाबत उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच बारामती येथील ऊस तोडणी हार्वेस्ट चालकांकडून सबसिडीच्या नावाखाली पैसे उकळण्याचा आरोप देखील वाल्मीक कराडवर झाला आहे. कराड हे मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूकच सत्ताधारी करत असतील तर त्यांनी न्याय मागायचा कुणाकडे असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे

शेतकऱ्यांवर कारवाई नको
एक रुपया पीक विमा प्रकरणात आता बोगस अर्जावरून शेतकऱ्यांना शिक्षा देऊ नये. मंत्र्यांच्या सूचनेशिवाय योजनेत भ्रष्टाचार होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली.

Web Title: Appoint a committee to investigate the decisions taken by Munde.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.