योगेश पांडे
नागपूर : एका रोमियोने प्रेयसीच्या घरी रात्री जात तिला दरवाजा उघडण्यासाठी जबरदस्ती केली. तिने विरोध केला असता संतापाने त्याने तिच्या भावाच्या दुचाकीच जाळल्या. या प्रकारामुळे खळबळ उडाली होती. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
स्नेहल सुनिल अंबादे (भंते आनंद कौशल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. सोमवारी रात्री एक वाजता तो तिच्या घरी पोहोचला व जिन्यावरून वर जात त्याने तिच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. त्याने तिला दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र तरुणी घाबरली व तिने दरवाजाच उघडला नाही. यामुळे संतापलेल्या स्नेहलने तिला शिवीगाळ केली व तुझ्या भावाला ठार मारेन अशी त्याने धमकी दिली. हादरलेल्या तरुणीने दरवाजा उघडलाच नाही.
काही वेळाने आरोपी खाली गेला व त्याने तिच्या भावाच्या दोन दुचाकींना आग लावली. आरोपीने शेजारच्या व्यक्तीच्या दुचाकीलादेखील पेटविले. शेजारच्या लोकांनी आग पाहून तिच्या भावाला उठविले. सगळ्यांनी धावपळ करत दुचाकी विझविण्याचा प्रयत्न केला. तरुणीच्या भावाच्या तक्रारीवरून स्नेहल अंबादेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.