पार्टनरशिपच्या वादातून मित्रावर ताणली बंदूक, अन् गोळी झाडणार इतक्यात..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2022 13:20 IST2022-09-28T13:14:32+5:302022-09-28T13:20:10+5:30
कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, गुन्हा दाखल

पार्टनरशिपच्या वादातून मित्रावर ताणली बंदूक, अन् गोळी झाडणार इतक्यात..
नागपूर : पार्टनरशिपच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादातून एका व्यक्तीने आपल्याच मित्राचा पिस्तूलने जीव घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्यावेळी गोळी न चालल्याने व दुसऱ्या प्रयत्नात ऐनवेळी मित्राच्या पत्नीने धक्का देऊन बाजूला केल्याने प्राण वाचले. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
बोखारा येथे राहणारा आरोपी रेहान अंसारी असलम मियाजी (वय ३०) याची मो. शरीफ मो. रफिक अन्सारी (३७, यशोधरानगर) याच्याशी मैत्री आहे. जून २०२१ मध्ये दोघांनीही पार्टनरशिपमध्ये बोखारा येथे हॉटेल संजेरी ताज सुरू केले. काही दिवसांनंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यातून रेहानने अन्सारीला पार्टनरशिप सोडून दे, मी तुझे पैसे परत देईन असे म्हटले. त्यानंतर अन्सारीने पार्टनरशिप सोडली. तेव्हापासून त्यांच्यात ३५ लाखांच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता. रेहानने अन्सारीला साडेएकोणीस लाख रुपये दिले होते. उरलेले पैसे परत करण्यासाठी तो टाळाटाळ करत होता. त्याने त्याचे हॉटेलदेखील इतर व्यक्तीला भाड्याने दिले.
ही बाब कळताच अन्सारी पैसे मागण्यासाठी त्याच्या पत्नीसह रेहानच्या घरी गेला होता. तेव्हा परत त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. संतप्त झालेल्या रेहानने घराच्या छतावरून खाली उतरत अन्सारीवर पिस्तुलातून गोळी चालविली. मात्र, ती गोळी चाललीच नाही व खाली पाडली. रेहानने परत पिस्तूल लोड करून अन्सारीच्या छातीवर ठेवली. तो पिस्तूल चालविण्याच्या आतच अन्सारीच्या पत्नीने रेहानला धक्का देत बाजूला केले. त्यानंतर दोघेही तेथून निघून गेले व कोराडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत रेहानविरोधात गुन्हा नोंदविला.