लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीचा सण जवळ येताच घरापासून दूर राहणारे विद्यार्थी, नोकरी आणि व्यवसायानिमित्त इतर शहरांत असलेले नागपूरकर घरी परतण्याची लगबग करतात. पण, यंदा या प्रवासाचा आनंद महागात पडणार आहे. पुणे व मुंबई ते नागपूर या मार्गावरील विमान आणि बस प्रवासाचे दर अक्षरशः आकाशाला भिडले आहेत.
पुणे आणि मुंबईहून नागपूरकडे येणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर मागील काही दिवसांत झपाट्याने वाढले आहेत. सध्या काही विमानांचे दर १५ ते २० हजारांपर्यंत पोहोचले असून, हे दर नेहमीच्या तुलनेत तब्बल तीन ते चार पट जास्त आहेत. ऑनलाइन बुकिंग वेबसाइट्सवर प्रवासाच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसतसे तिकिटांचे दर वाढत आहेत. प्रवासी मागणी वाढताच विमान कंपन्यांनी 'डायनॅमिक प्राइसिंग'च्या नावाखाली मनमानी सुरू केली आहे.
बसवाल्यांनीही सुरू केली दरवाढीची स्पर्धा
फक्त विमान कंपन्याच नाही, तर बस ऑपरेटर्सनीही या गर्दीचा फायदा घेतला आहे. पुणे-नागपूर मार्गावरील व्हॉल्वो आणि लक्झरी बसेसचे दर सध्या ४,५०० ते ५,५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, जे नेहमीच्या दिवसांत १२०० ते १४०० रुपये असतात. ऑनलाइन बुकिंग साइट्सवर १७ ऑक्टोबरच्या बस प्रवासाचे दर ५,५४२ रुपये तर १८ ऑक्टोबरच्या प्रवासासाठी ५,०३८ रुपये इतके दाखवले जात आहेत. म्हणजेच दिवाळीच्या सणात नागपूरला जाण्यासाठी 'घरी परतणे'च महाग झाले आहे.
रेल्वे तिकिटांचा 'वेटिंग'चा खेळ
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, दिल्ली, हैदराबाद आदी ठिकाणांहून नागपूरकडे येणाऱ्या सर्व रेल्वेच्या आरक्षणांमध्ये 'नो स्पेस'ची स्थिती आहे. तिकिटांचे आरक्षण काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले असून, तत्काल आणि प्रीमियम तत्कालमध्ये जागा मिळवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे लोकांकडे बस किंवा विमान हेच पर्याय उरले आहेत, पण तेही आता खिशावर भारी पडत आहेत.
"तिकिटांचे दर मागणी आणि उपलब्धता यावर ठरतात. प्रवाशांची संख्या वाढली की दर वाढतात, हे स्वाभाविक आहे. मात्र प्रवाशांच्या दृष्टीने ही दरवाढ म्हणजे सणासुदीच्या आनंदावर महागाईचा तडाखा आहे. यंदा पावसामुळे टूर्स ऑपरेटर्सच्या धंद्यावर संक्रांत आली आहे."- मार्मिक शेंडे, संचालक, धनलक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हर्स.
"सणासुदीच्या काळात दरवर्षीच हीच परिस्थिती असते. विमान आणि बस कंपन्या प्रवाशांची लूट करतात. सरकारने अशा मनमानी दरांवर नियंत्रण ठेवावे."- विराज कणके, प्रवासी
Web Summary : Diwali travel costs soar as flight and bus fares from Mumbai, Pune to Nagpur surge. Passengers face exorbitant prices due to high demand. Trains are fully booked, leaving limited options. Citizens urge government to regulate fares.
Web Summary : दिवाली पर मुंबई, पुणे से नागपुर के लिए विमान और बस का किराया बढ़ा। यात्रियों को अधिक कीमत चुकानी पड़ रही है क्योंकि मांग अधिक है। ट्रेनें पूरी तरह से बुक हैं, जिससे विकल्प सीमित हैं। नागरिक सरकार से किराए को विनियमित करने का आग्रह करते हैं।