Video : भरवस्तीमधील अगरबत्ती कारखाना आगीत खाक; अग्निशमनच्या ८ बंबांनी आणले नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 15:16 IST2022-06-03T13:52:10+5:302022-06-04T15:16:33+5:30
या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Video : भरवस्तीमधील अगरबत्ती कारखाना आगीत खाक; अग्निशमनच्या ८ बंबांनी आणले नियंत्रण
नागपूर : यशोधरानगर हद्दीतील प्रवेशनगरात शुक्रवारी दुपारी अगरबत्तीच्या कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत कारखान्यातील सर्व साहित्य जळाले. परंतु अगरबत्ती तयार करताना आवश्यक असलेल्या ज्वलनशील साहित्यामुळे आग विझविता विझविता अग्निशमन पथकाच्या नाकीनऊ आले. दुपारी १२ वाजता लागलेली आग सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत धुमसत होती. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हा अगरबत्ती भर कारखाना वस्तीत होता. दुपारी कारखान्यात कामगार काम करीत होते. १२.२० वाजताच्या सुमारास आग लागल्याने कामगार व शेजाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. लोकांनी आग विझविण्यासाठी सुरुवातीला पाणीही टाकले; पण कारखान्यात असलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचा भडका चांगलाच वाढला होता.
नागपुरात अगरबत्ती कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाच्या ६ ते ८ गाड्या घटनास्थळी दाखल#nagpurpic.twitter.com/IX2die4hjv
— Lokmat (@lokmat) June 3, 2022
अग्निशमन विभागाला आगीची सूचना मिळाल्याबरोबरच पाण्याच्या पाच टँकरसह ८ वाहने घटनास्थळी दाखल झाले. ३ हजार चौरस फुटात असलेल्या कारखान्याला आगीने कवेत घेतले होते. पथकाने आगीचा प्रभाव कमी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. आगीच्या ज्वाला आणि भडके थांबविण्यात यशही आले; पण कारखान्यात असलेल्या ज्वलनशील पदार्थामुळे धुसफुस सुरूच होती. अग्निशमन विभागाचे पथक सायंकाळपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते. जेसीपीद्वारे साहित्य बाहेर काढण्यात आले.
चार दुचाकीही जळाल्या
या आगीत कारखान्याजवळ असलेल्या ४ दुचाकी जळाल्याची माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा पंचनामा विभागाकडून केला जात असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.
वस्तीत भीती
कारखाना अगदी भर वस्तीत आहे. लागूनच घरेही होती. त्यामुळे आग वस्तीत पसरण्याचाही धोका होता. धुराचे लोट आकाशात झेपावलेले पहाताना वस्तीमधील लोकांच्या मनात दहशत जाणवत होती. मात्र सुदैवाने जवानांनी आग पसरू दिली नाही. यामुळे अनर्थ टळला.