फडणवीसांवर आरोप करणाऱ्या वकील उके यांची ईडीकडून सहा तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 07:40 IST2022-04-01T07:39:46+5:302022-04-01T07:40:23+5:30

एका ६० वर्षीय महिलेने उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन बळकावल्याची तक्रार केली.

Advocate Uke arrest by ED, who interrogates Fadnavis | फडणवीसांवर आरोप करणाऱ्या वकील उके यांची ईडीकडून सहा तास चौकशी

फडणवीसांवर आरोप करणाऱ्या वकील उके यांची ईडीकडून सहा तास चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक काँग्रेस नेत्यांचे वकीलपत्र घेतलेले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खटला दाखल करणारे ॲड. सतीश उके यांच्या घरी गुरुवारी पहाटे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा टाकला. सहा तास कसून चौकशी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी ॲड. उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना अटक केली.  फडणवीस, नितीन गडकरी आणि आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ॲड. उके सातत्याने आरोप करीत आहेत. न्यायमूर्ती लोया मृत्युप्रकरणी ॲड. उकेंनी अनेक दावे केले होते. फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याचीही मागणी केली होती. 

असे आहे प्रकरण

एका ६० वर्षीय महिलेने उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन बळकावल्याची तक्रार केली. गुन्हे शाखेने अनेक तास चौकशी केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. ईडीने टाकलेला छापा हा त्याच अनुषंगाने असू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पुरावे नष्ट करण्यासाठी छापा 
ॲड. उके यांच्या लॅपटॉपमध्ये फडणवीस यांच्याविरुद्धच्या केसेस, न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरण, निमगडे खून प्रकरणाचे पुरावे होते. ते पुरावे नष्ट करण्यासाठीच हा छापा घातला गेला व लॅपटॉप जप्त केल्याचा आरोप प्रदीप उके यांनी केला.

Web Title: Advocate Uke arrest by ED, who interrogates Fadnavis