विदर्भात प्रशासकीय खांदेपालट ! कुमार आशीर्वाद नागपूरचे नवे जिल्हाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 14:09 IST2026-04-03T14:07:06+5:302026-04-03T14:09:49+5:30
Nagpur : नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, बुलढाण्याला नवे जिल्हाधिकारी; अमरावतीला मनपा आयुक्त व सीईओ

Administrative reshuffle in Vidarbha! Kumar Ashirwad is the new Collector of Nagpur
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाने गुरुवारी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी असून, यात विदर्भातीलनागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि बुलढाण्याला नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत. तर अमरावती जिल्ह्याला मनपा आयुक्त आणि नवे सीईओ मिळाले आहेत. यासोबतच नवे रोहयो आयुक्तसुद्धा मिळाले आहेत.
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून, नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांची चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून, गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. मंगेश गोंदावले तर बुलढाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वर्षा लड्ढा यांची अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी, तर सत्यम गांधी यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा-चांडक या प्रसूती रजेवर जात असल्याने त्यांच्या रिक्त जागी वर्षा लड्ढा यांची वर्णी लागली आहे. लढा या सध्या पुणे येथील महाराष्ट्र कृषी संशोधन व शैक्षणिक परिषदेत सदस्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. यासोबतच नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अंकित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दीपक सिंगला रोहयो आयुक्त
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त भारत बास्टेवाड यांची लातूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी दीपक सिंगला यांची बदली करण्यात आली आहे. सिंगला हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.