नगरसेविकेच्या पतीसह १५ आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत कारवाई; माजी नगरसेवकावर केला होता हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:59 IST2026-01-28T16:51:59+5:302026-01-28T16:59:21+5:30
Nagpur : प्रभाग ११ येथील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका मंजू चाचेरकरचा पती गणेश याच्यासह १५ आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Action under MCOCA against 15 accused including corporator's husband; Former corporator was attacked
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रभाग ११ येथील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका मंजू चाचेरकरचा पती गणेश याच्यासह १५ आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी मतदानाच्या एक दिवस अगोदर माजी नगरसेवक भूषण शिंगणे यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केले होते. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त नित्यानंद झा यांनी यासंदर्भात प्रस्ताव सादर केला होता. शहरातील इतरही गँगविरोधात पोलिस अशीच तत्पर कारवाई करून मकोकासारखी मोठी कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
१४ जानेवारीच्या रात्री गणेश उर्फ घुई आनंदराव चाचेरकर (४०, गोरेवाडा, जुनी वस्ती) याने साथीदारांसोबत मिळून भूषण कृष्णराव शिंगणे (५८), प्रवीण नामदेवराव मते (४९), रुपेश सीताराम ठाकरे (५४) यांना मारहाण करत जखमी केले होते. घुईने शिंगणे यांचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तेथे ९० ते १०० लोक हातात फायटर, लाठ्या, गुप्ती, चाकू घेऊन जमले होते. आरोपींनी शिंगणे व मते यांचा फोनदेखील हिसकावला होता. विठ्ठल अडाणे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, निकाल लागल्यानंतर घुई व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. मंगेश रमेश मांग (३९, गोतमारे ले-आऊट, ब्राह्मणी, कळमेश्वर), नितेश उर्फ नितीन कृष्णाजी बगडे (४०, महाजन ले आऊट, कळमेश्वर), अमित विजय मेश्राम (३४, जोगीनगर, रामेश्वरी), आशिष नामदेवराव भड (४१, सुपर टाऊन, पारशिवनी), अंकुश विजयराव कोचे (३०, पँथर चौक, पुलगाव), रोशन दिलीप परतेकी (३४, गोरेवाडा, जुनी वस्ती), राहुल निर्भय अठरोकार (२५, गोरेवाडा, जुनी वस्ती), योगेश दिलीप कापसे (२७, गोरेवाडा, जुनी वस्ती), पीयूष उर्फ बच्चा राजेंद्र भोंगाडे (२७, भडांगी, कळमेश्वर), सुधीर भाऊराव धुमाळ (३६, गोरेवाडा, जुनी वस्ती), चेतन पांडुरंग युवनाते (२२, गोरेवाडा), सुमित नरेश जामगडे (२९, गोरेवाडा, जुनी वस्ती), तरूण विनोद बमनेरे (२५, माधवनगर, गोरेवाडा) व नीलेश उर्फ अन्ना ब्रिजलाल उईके (महेशनगर) यांचा आरोपींमध्ये समावेश होता. आरोपींनी संघटित होऊन गुन्हा केला असून, त्यांच्या विरोधात मकोकाअंतर्गत कारवाई व्हावी, असा प्रस्ताव झा यांनी अपर पोलिस आयुक्तांकडे सादर केला होता. त्याला मंजुरी देण्यात आली.
इतर गँगवर कारवाई कधी?
आजच्या घडीला शहरात विविध टोळ्या कार्यरत असून, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. या प्रकरणात तत्पर असलेल्या पोलिस विभागाकडून शहरातील इतर टोळ्यांविरोधात ठोस कारवाई कधी करण्यात येईल, हा सवाल उपस्थित होत आहे.
१४ जानेवारी भूषण शिंगणे यांच्यावर हल्ला
१५ जानेवारी चाचेरकर व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
१५ जानेवारी मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांनी घेतली शिंगणे यांची भेट
१६ जानेवारी भूषण शिंगणे यांचा पराभव, मंजू चाचेरकर यांचा विजय
२७ जानेवारी दोन आठवड्यांच्या आत सर्व आरोपींवर मकोकाची कारवाई