शिकवणीला निघालेल्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 01:29 AM2018-11-27T01:29:49+5:302018-11-27T01:30:20+5:30

भरधाव बसने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील लहान बहिणीचा करुण अंत झाला. तर, मोठी बहीण गंभीर जखमी झाली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी २ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने बसची तोडफोड करून आरोपी चालकाची बेदम धुलाई केली.

Accidental death of a student going Teaching | शिकवणीला निघालेल्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू

शिकवणीला निघालेल्या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू

Next
ठळक मुद्देभरधाव बसची धडक : अपघातात मोठी बहीणही जखमी : संतप्त जमावाकडून बसची तोडफोड, तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव बसने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील लहान बहिणीचा करुण अंत झाला. तर, मोठी बहीण गंभीर जखमी झाली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी २ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने बसची तोडफोड करून आरोपी चालकाची बेदम धुलाई केली.
नंदनवनमधील जयभीम चौकाजवळच्या हिवरीनगर झोपडपट्टीत राहणारी निकिता पांडुरंगजी खोप (वय २०) तिची लहान बहीण रागिणी (वय १२) हिला आपल्या अ‍ॅक्टिव्हावर बसवून महालकडे जात होती. गंगाबाई घाट चौकाजवळच्या गंगा मार्बल दुकानाजवळ आरोपी बसचालक मनीष सखाराम सोनटक्के (वय २७, रा. वर्धमाननगर) याने त्याच्या ताब्यातील बस (एमएच ४०/ एन ८५९९) निष्काळजीपणे चालवून निकिताच्या दुचाकीला समोरून धडक मारली. त्यामुळे खाली पडून गंभीर जखमी झाल्याने रागिणीचा मृत्यू झाला तर निकिता जबर जखमी झाली.
अत्यंत वर्दळीच्या भागात भरदिवसा हा भीषण अपघात झाल्याने संतप्त जमावाने बसचालकाला खाली खेचले. त्याची बेदम धुलाई करून बसवर दगडफेक केली. बसची तोडफोड करतानाच काहींनी बसच्या इंधन टँकला फोडून आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यातच नंदनवन पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. तोपर्यंत तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमाव जुमानत नसल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर करून जमावाच्या ताब्यातून आरोपी बसचालक मनीष सोनटक्केला ताब्यात घेतले. जमावाला पांगविल्यानंतर अपघातग्रस्त वाहने तेथून हटविण्यात आली. त्यानंतर तणाव निवळला.
कुटुंबीयांवर जबर मानसिक आघात
या अपघाताने खोप कुटुंबीयांवर जबर मानसिक आघात झाला आहे. जखमी निकिताचे वडील पांडुरंग आनंदराव खोप (वय ५३) हे विणकर आहेत. सर्वसाधारण स्थितीतूनही त्यांनी मुलींना शिकवून मोठे अधिकारी बनविण्याचे स्वप्न बघितले होते. मृत रागिणी सहावीत शिकत होती. तिला शिकवणी वर्गाला सोडण्यासाठी निकिता घरून निघाली होती. रागिणीच्या मृत्युमुळे निकितालाही जबर मानसिक धक्का बसला आहे. ती रुग्णालयात दाखल आहे. ती काही बोलण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे समजते.

Web Title: Accidental death of a student going Teaching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.