कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 23:07 IST2025-08-18T23:06:43+5:302025-08-18T23:07:48+5:30
सामाजिक, साहित्य वर्तुळात शाेक, अहमदाबाद, गुवाहाटीसह अनेक विमानतळ निर्मितीत याेगदान, ‘लाेकमतसह’ विविध साप्ताहिक, मासिक पत्रिकांमध्ये कृषी क्षेत्रातील विविध मुद्यांवर लेखन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे.

कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी
निशांत वानखेडे
नागपूर - ज्येष्ठ समाजसेवक, कृषीतज्ज्ञ, शेतकरी नेते, पर्यावरण विषयाचे गाढे अभ्यासक आणि एअरपाेर्ट ऑथाेरिटी ऑफ इंडियाचे माजी कार्यकारी अभियंता अमिताभ माेतीराम पावडे यांचे साेमवारी रस्ते अपघातात निधन झाले. ते ६१ वर्षांचे हाेते. अनेक संघटनांशी जुळून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अमिताभ पावडे यांच्या आकस्मिक निधनाने सामाजिक वर्तुळात शाेककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी माेक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व बराच माेठा आप्तपरिवार आहे.
मूळचे नरखेड तालुक्यातील येरला या गावचे रहिवासी अमिताभ पावडे यांनी नागपुरातल्या केंद्रीय विद्यालयातून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. भारतीय विमानतळ प्राधिकरणात नियुक्त झाल्यानंतर अनेक वर्षे सेवा दिली. गुजरातच्या अहमदाबादचे विमानतळ, तसेच गुवाहाटी, भाेपाळ व इंदूरच्या विमानतळाच्या निर्मितीत त्यांचे महत्त्वाचे याेगदान राहिले आहे. एअराेनाॅटिकच्या तांत्रिक बाबतीत निष्णात अभियंता असलेल्या पावडे यांनी आपल्या सेवाकाळात पूर्वाेत्तर राज्यातील २४ विमानतळाच्या नियंत्रणाचे कार्य केले. त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेत वडिलाेपार्जित शेतीकडून पूर्णवेळ लक्ष दिले. साेबत सामाजिक क्षेत्रातही त्यांची सक्रियता वाढली.
शहराच्या सामाजिक वर्तूळात अत्यंत आदराचे व्यक्तीमत्व असलेल्या अमिताभ पावडे यांनी गांधीवादी व आंबेडकरवादी या एकत्रित विचारांचा समाजसेवेचा वारसा वडील मोतीराम आणि आई कुमूद पावडे यांच्याकडूनच मिळाला होता. आईवडिलांनी धंतोलीत पहिली रात्र शाळा सुरू केली हाेती. विदर्भात पहिला आंतरजातीय विवाह करणाऱ्या मोतीराम आणि कुमूद यांच्या संस्कारामुळे पावडे कुटुंबाने समाजाविषयी नाळ जपली आहे. समाजातले शोषित, वंचित, शेतकरी आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्यांविषयी अमिताभ पावडे यांनी अखेरच्या श्वासापर्यंत निःस्वार्थी समाजसेवा केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी विपूल लेखन केले आहे. ‘लाेकमतसह’ विविध साप्ताहिक, मासिक पत्रिकांमध्ये कृषी क्षेत्रातील विविध मुद्यांवर लेखन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कृषी परिषदांमध्ये त्यांची उपस्थिती असायची.
घराजवळच झाला अपघात
अमिताभ पावडे हे धंताेलीतील साठे मार्गावर राहायचे. घराजवळच हा भीषण अपघात झाला. काही खासगी कामानिमित्त सायंकाळी ५. ३० वाजता आपल्या सीडी १०० एम. व्ही. जे ७९०४ या दुचाकीने राठी हॉस्पिटल समोरील चौककडे जात होते. त्याच वेळी भरधाव वेगात आलेल्या एम. एच. ३१ एफ. ई. ६८२४ बुलेटची अमिताभ पावडे यांना धडक बसली. यात गंभीर जखमी पावडे यांना न्युरान हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र मेंदूला झालेल्या अंतर्गत जखमांमुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धंतोली पोलीसांनी गुन्हा दाखल करीत बुलेट चालकाचा शोध सुरू केला आहे.