मागण्या मान्य करा अन्यथा.. ऐन दिवाळीच्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा दिला इशारा
By नरेश डोंगरे | Updated: October 9, 2025 19:51 IST2025-10-09T19:50:19+5:302025-10-09T19:51:40+5:30
एसटी महामंडळ : कामगार संयुक्त कृती समितीचा ईशारा

Accept the demands or else.. ST employees warned to protest during Diwali
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य परिवहन विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या नाही तर १४ ऑक्टोबरपासून विदर्भातील एसटीचे कर्मचारी जागोजागी बेमुदत धरणे आंदोलन करतील, असा ईशारा महाराष्ट्र एसटी कामगार संयूक्त कृती समितीने दिला आहे. त्या संबंधाने कृती समितीच्या वतिने विभाग नियंत्रक आणि विभागीय व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार संयूक्त कृती समिती नागपूर विभागा मार्फत ७ ऑक्टोबरला एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. त्यानुसार,कामगारांच्या प्रलंबित मागण्या तसेच आर्थिक प्रश्नाच्या संबंधाने मुंबईच्या एसटी मध्यवर्ती कार्यालयात १३ ऑक्टोबरला धरणे आंदोलन केले जाणार आहे. त्याची दखल घेतली नाही तर १४ ऑक्टोबर पासून एसटीच्या नागपूर विभागातील विभागीय कार्यालये, कार्यशाळा आणि सर्व आगारात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याचीही दखल घेतली गेली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचाही निर्णय घेण्यात आला. यावेळी कृती समिती मधील महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार, कामगार सेनेच्या राज्य महिला संघटिका यामिनी कोंगे, महाराष्ट्र मोटार फेडरेशनचे विनोद धाबर्डे, कास्टट्राईब संघटनेचे संग्राम जाधव, मकेश्वर, महाराष्ट्र परिवहन मजदूर युनियनचे मुन्ना मेश्राम, सुधाकर गजभिये, सोसायटी अध्यक्ष प्रशांत बोकडे तसेच अरुण भागवत, मुरलीधर गुरपुडे, संघटनेचे विभागीय अध्यक्ष जगदीश पाटमासे, कृष्णकुमार शेरकर, शशिकांत वानखेडे, अतुल निंबाळकर, गजानन दमकोंडवार, प्रवीण अंजनकर, लक्ष्मीकांत चौधरी, डीमोले जी, नितेश साकरकर, शर्माजी, संदीप गडकीने, रितेश देशमुख, दिनेश पारडकर यांच्या सह मोठ्या प्रमाणात कृती समितीचे सभासद उपस्थित होते.
प्रवाशांची गैरसोय
विशेष म्हणजे, दिवाळीच्या सणात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशात ऐन दिवाळीच्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यास प्रवाशांची तीव्र गैरसोय होऊ शकते. ते टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे.