दहाच महिन्यांत 'अब तक ६८' हत्या; घटनांवर पोलिसांचे नियंत्रण नाहीच!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 01:35 PM2023-10-30T13:35:00+5:302023-10-30T13:36:09+5:30

किरकोळ वादांतून हत्यांचा निष्कर्ष : इतर घटनांबाबत अध्ययन काय?

'Ab tak 68' murders in ten months; The police have no control over the incidents! | दहाच महिन्यांत 'अब तक ६८' हत्या; घटनांवर पोलिसांचे नियंत्रण नाहीच!

दहाच महिन्यांत 'अब तक ६८' हत्या; घटनांवर पोलिसांचे नियंत्रण नाहीच!

नागपूरउपराजधानीतील वरिष्ठ अधिकारी ‘फेव्हरेबल’ आकडेवारी मांडून स्वत:ची पाठ थोपटून घेत असले तरी प्रत्यक्षात नागपुरात हत्यांच्या घटनांसह गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे वास्तव आहे. जवळपास १० महिन्यांत नागपुरात ६८ हत्यांच्या घटनांची नोंद झाली आहे. नागपूर पोलिसांचे अपयश स्पष्टपणे दिसून येत असताना पोलिसांनी एका अध्ययनातील निष्कर्ष मांडला आहे. किरकोळ वादांतून हत्या होत असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. मात्र, पोलिस अशाच प्रकारचे अध्ययन वाढते महिला अत्याचार, घरफोडी, चोरी व इतर गंभीर गुन्ह्यांबाबत करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मागील वर्षभरात नागपुरात ६५ हत्यांची नोंद झाली होती व १०८ जणांना त्यात अटक झाली होती. यंदा जानेवारी ते २८ ऑक्टोबर या कालावधीत ६८ जणांची हत्या झाली व ८० हून अधिक जणांना अटक झाली. पोलिसांनी या हत्यांचे अध्ययन केल्याचा दावा केला आहे. यातील ३३ हत्या किरकोळ वादातून घडल्या आहेत. कौटुंबिक कलह, प्रेमसंबंधात दुरावा किंवा जोडीदाराच्या चारित्र्यावर संशय ही खुनाची दुसरी प्रमुख कारणे म्हणून समोर आली आहेत. मात्र, दहा महिन्यांत व्यावसायिक गुन्हेगारांच्या हातून २१ जणांची हत्या झाली आहे. १३ घटनांतील मयत आणि आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. ६८ खुनाच्या घटनांपैकी ३४ अशा आहेत ज्यात आरोपींनी पहिल्यांदाच गुन्हा केला आहे. मात्र हत्या करण्यापर्यंत एखाद्या व्यक्तीची मजल जाते याचा अर्थ त्याच्या मनात कायद्याबाबत धाक राहिला नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महिला अत्याचार व गंभीर गुन्ह्यांचे काय?

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महिला अत्याचार तसेच गंभीर गु्न्ह्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. मात्र त्याबाबत पोलिसांचे कुठलेही अध्ययन समोर आलेले नाही. एकूण चोरी, वाहनचोरी, फसवणुकीच्या घटना, खंडणी यातदेखील मोठी वाढ झाली आहे. मात्र या घटनांची आकडेवारीच पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असल्याने याबाबतची कुठलीही ‘फेव्हरेबल’ आकडेवारी समोर आलेली नाही.

हत्यांची कारणे

क्षुल्लक गोष्टीवरील वाद : ३३

प्रेम प्रकरण, चारित्र्यावर संशय, घरगुती कलह : १६

जुन्या वादाचे कारण : ८

पैसे किंवा मालमत्तेचे वाद : ८

दारू पिण्यावरून वाद : ३

Web Title: 'Ab tak 68' murders in ten months; The police have no control over the incidents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.