क्रौर्याची परिसीमा! दहा वर्षीय मुलीवर सैतानी अत्याचार करून बनवले वेठबिगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 13:16 IST2023-09-02T13:13:50+5:302023-09-02T13:16:03+5:30
बालिकेच्या मनात खोलवर दहशत : आरोपीच्या शोधात पथक बंगळुरूला रवाना

क्रौर्याची परिसीमा! दहा वर्षीय मुलीवर सैतानी अत्याचार करून बनवले वेठबिगार
नागपूर : गरिबीचा फायदा घेत पालकांकडून खरेदी केलेल्या १० वर्षांच्या मुलीला घरकामाला जुंपल्यावर तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची बाब समोर आल्यानंतर अवघे समाजमन हादरले आहे. संबंधित मुलीच्या मानसिकतेवर तर मोठा परिणाम झाला आहे. त्या मुलीच्या मनात खोलवर दहशत असून ती दिवसातून अनेकदा ‘हिना दीदी आ जाएंगी’ असे म्हणत आहे. यातूनच आरोपी कुटुंबाने तिच्यावर अन्याय करताना क्रौर्याची हद्द पार केल्याचे लक्षात येत आहे. दरम्यान, आरोपी अरमान इश्ताक अहमद खान (३९) याची शुक्रवारी चौकशी करण्यात आली व त्याची पत्नी हीना (२६) व मेहुणा अजहर यांच्या शोधासाठी तपास पथक बंगळुरूकडे रवाना झाले आहे.
बेसा-पिपळा मार्गावरील अथर्व नगरी-३ मधील घर क्रमांक ११ राहणाऱ्या आरोपींनी हा प्रकार केला. बंगळुरूमधील असलेले हे कुटुंब व्यवसायानिमित्त येथे स्थायिक झाले. बंगळुरूमधील हलाखीच्या परिस्थितीतील एका कुटुंबातील मुलीला त्यांनी दोन वर्षांअगोदर नागपुरात आणले. तिला शिक्षण देऊ, वाढवू असे म्हणत त्यांनी तिला आणले. प्रत्यक्षात ते तिच्याकडून घरकाम करवून घेऊ लागले. तिने काही चूक केली तर अगोदर ते तिला रागवायचे. मात्र, त्यानंतर त्यांनी क्रूरपणे वागायला सुरुवात केली व तिला मारहाण करायला लागले. तिघेही जण तिला लहानसहान चुकांवर तवा, सराटा किंवा सिगारेटचे चटके द्यायचे. अगदी तिच्या गुप्तांगाला चटके देण्यापर्यंत त्यांची मजल गेली.
अरमान व अजहरने तिच्यावर लैंगिक अत्याचारदेखील केले. सर्व आरोपी लहान मुलांसह २४ ऑगस्ट रोजी बंगळुरूला गेले व जाताना मुलीला घरातील एका कोंदट खोलीत कोंडून गेले. जाताना केवळ काही ब्रेडची पाकिटे ठेवली होती. मुलगी तहान-भुकेने व्याकूळ होऊन खोलीत बसली होती. अचानक दोन दिवसांअगोदर वीज विभागाचे कर्मचारी वीज कापण्यासाठी आले. अंधार झाल्याने भेदरलेल्या मुलीने हिंमत करून खिडकीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणाची चौकशी करत असताना अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आरोपींनी तिला विकत आणल्याचे सांगत अनेकदा जिवे मारण्याचीदेखील धमकी दिली. तसेच, तिला अनेकदा जेवणदेखील दिले जात नव्हते व तिला जमिनीवर झोपायला लावायचे. या प्रकरणात आरोपी अरमानला १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची पत्नी आणि मेहुण्यासाठी पोलिसांचे एक पथक बंगळुरूला पाठवण्यात आले आहे.
अक्षरश: नरकमय होते बालिकेचे आयुष्य
लैंगिक शोषणाची शिकार झालेल्या दहा वर्षांची मुलीचे नागपुरात आल्यापासून नरकमय आयुष्य झाले होते. तिला अक्षरश: वेठबिगारासारखे वागविले जात होते. अगोदर आरोपी जाफरनगर येथे राहायचे व त्यानंतर अथर्वनगरीमध्ये राहायला आले होते. मुलीकडून घरातील सर्वच कामे करवून घेतली जात होती. तिला चटके देणे नेहमीचाच प्रकार झाला होता. मात्र, तिच्या गुप्तांगाला रोलिंग पिन व स्टीलच्या चमचाने इजा करण्यात येत होती. तिने काही वेळा शाळेत पाठविण्याबाबत म्हटले असता तुला आम्ही विकत घेतले आहे आणि तुझ्यासोबत वाट्टेल ते करू शकतो, असे उत्तर हिना द्यायची.