विद्यार्थ्याच्या दुचाकीला भरधाव वाहनाची धडक; एक ठार, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 17:53 IST2022-03-04T15:04:10+5:302022-03-04T17:53:36+5:30
आज दुपारी ३ च्या सुमारास कामठी-नागपूर मार्गावर मोहम्मद अली पेट्रोल पंपसमोर विद्यार्थ्याच्या दुचाकीला भरधाव आयशर वाहनाने जबर धडक दिली. या घटनेत एक विद्यार्थी गतप्राण तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले.

विद्यार्थ्याच्या दुचाकीला भरधाव वाहनाची धडक; एक ठार, दोघे जखमी
नागपूर : शाळेतून दहावीच्या परीक्षेची माहिती घेऊन दुचाकीने घराकडे निघालेल्या विद्यार्थ्याच्या दुचाकीला भरधाव आयशर वाहनाने जबर धडक दिली. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून दोन विद्यार्थी गंभीर झाले आहेत.
शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास कामठी-नागपूर मार्गावर असलेल्या मोहम्मद अली पेट्रोल पंप समोर हा भीषण अपघात घडला. दिशांत महादेव पटले (वय १७, रा. रानाडा कामठी निवास) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तर, मयंक कुमार सिंह व आरव चौधरी अशी जखमींची नावे आहेत. हे तिघेही दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस) चे विद्यार्थी आहेत.
हे तिघे दुचाकीने (एमएच ३५ झेड ०५७९) घराकडे जात असताना भरधाव वेगात असलेल्या आयशर वाहनाने (एमएच ४० वाय २०९७) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याने तणाव निर्माण झाला होता.
माहिती कळताच यशोधरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृत व जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात पोहोचवले. पोलिसांनी सदर आयशर वाहन व चालकाला ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.