साळ्याच्या मित्राने बायको-मेहुणीसह केला घात, मारहाण करत चेन-अंगठीवर मारला हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 15:48 IST2024-04-23T15:44:19+5:302024-04-23T15:48:32+5:30
Nagpur : नागपूर येथील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोन्याची चेन व अंगठी सोबत १८ हजार रक्कम हिसकावणारे चोर साळ्याचे मित्र

A man beaten and threaten after robbery
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मौदा येथून नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला त्याच्या साळ्याचाच मित्र व मित्राची बायको-मेहुणीने मारहाण करत सोन्याची चेन व अंगठी हिसकावत धमकी दिली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मेघश्याम वासुदेव धकाते (५२, मौदा) हे १४ एप्रिल रोजी कामासाठी कारने नागपुरात आले होते. काम आटोपून ते त्यांच्या साळ्याचा मित्र रवी श्रावण कैकाडे (४०, गंगा जमुना वस्ती) याला भेटण्यासाठी गेले होते. तेथे त्याने पत्नी अफसाना (३७) व मेहुणी बरखा (३५) यांच्याशी भेट करवून दिली. काही वेळाने शुल्लक बाबीवरून रवीने धकाते यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तिघांनीही धकाते यांना शिवीगाळ केली व हातपाय पकडून ठेवले. त्यांनी धकाते यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन हिसकावली. त्यानंतर त्यांच्या खिशातून कारची चाबी काढली व कारमधील सोन्याची अंगठी व रोख १८ हजार रुपयेदेखील हिसकावले. जर हा प्रकार कुणालाही सांगितला तर जीवे मारू अशी धमकी देण्यात आली. धकाते घाबरून मौदा येथे परतले. त्यांनी नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. त्यांनी हिंमत दिल्याने धकाते यांनी सोमवारी नागपुरात येऊन लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी रवी कैकाडे व दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून रवीला अटक करण्यात आली आहे.