एका हातात कुंचला, डोळ्यांत UPSC चे स्वप्न; नागपूरच्या जिद्दी प्रांजलची 'महालक्ष्मी सरस'मध्ये भरारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 09:53 IST2026-03-18T09:52:17+5:302026-03-18T09:53:26+5:30

दिव्यांगत्वावर मात, पेंटिंग्सचा व्यवसाय आणि आता लक्ष्य UPSC; उकळीच्या प्रांजलचा थक्क करणारा प्रवास!

A kunchala in one hand, a dream of UPSC in the eyes; Nagpur's stubborn Pranjal soars in 'Mahalakshmi Saras'! | एका हातात कुंचला, डोळ्यांत UPSC चे स्वप्न; नागपूरच्या जिद्दी प्रांजलची 'महालक्ष्मी सरस'मध्ये भरारी!

एका हातात कुंचला, डोळ्यांत UPSC चे स्वप्न; नागपूरच्या जिद्दी प्रांजलची 'महालक्ष्मी सरस'मध्ये भरारी!

क्षितिजा देशमुख

नशिबात काय लिहिले आहे यापेक्षा आपण काय करून दाखवतो, यावर यश अवलंबून असते, हे नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील उकळी गावच्या प्रांजल सांभारे हिने सिद्ध करून दाखवले आहे. शारीरिक व्याधी आणि दिव्यांगत्वाचे डोंगर समोर असतानाही, प्रांजलने केवळ चित्रकलेतून स्वतःचा व्यवसाय उभा केला नाही, तर ती आता UPSC सारख्या कठीण परीक्षेची तयारी करून प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्नही डोळ्यांत बाळगून आहे.

​शारीरिक मर्यादांवर कलेची मात

२५ वर्षीय प्रांजल जन्मजात पायाने दिव्यांग आहे. नियतीने तिची परीक्षा इथेच थांबवली नाही; कोरोनाच्या काळात तिला ‘न्यूरो मस्क्युलर डिसऑर्डर’ या गंभीर आजाराचे निदान झाले. या आजारामुळे शरीरातील हाडे आणि स्नायू हळूहळू कमकुवत होत जातात. मात्र, या अत्यंत कठीण परिस्थितीतही प्रांजल डगमगली नाही. तिने जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी प्राप्त केली.

चित्रकला बनली रोजगाराचे साधन

स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या ओढीने प्रांजलने आपल्या आवडीच्या चित्रकलेचा आधार घेतला. नैसर्गिक दृश्ये, विविध पोर्ट्रेट्स आणि आकर्षक पेंटिंग्स तयार करण्यास तिने सुरुवात केली. हळूहळू या कलेचे रूपांतर एका व्यवसायात झाले. आज तिच्या पेंटिंग्सना केवळ नागपुरातच नव्हे तर इतरत्रही मोठी मागणी आहे.

​महालक्ष्मी सरसमध्ये आकर्षणाचे केंद्र

नागपुरात सध्या सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस महोत्सवात’ उमेद अभियानाच्या माध्यमातून प्रांजलला आपला स्टॉल लावण्याची संधी मिळाली आहे. या स्टॉलवर तिने साकारलेली चित्रे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण तिच्या कलेचे आणि जिद्दीचे कौतुक करत आहे. तिच्या स्टॉलवरील पेंटिंग्स विक्रीतून तिला चांगला आर्थिक प्रतिसादही मिळत आहे.

UPSC चे ध्येय: कलेसोबतच अभ्यासाचाही व्यासंग

प्रांजल केवळ चित्रकलेतच रमली नाही, तर ती एक अभ्यासू तरुणी आहे. सध्या ती UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षेची गांभीर्याने तयारी करत आहे. प्रशासकीय अधिकारी होऊन समाजाची सेवा करण्याचे तिचे स्वप्न आहे. चित्रकलेतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर ती आपल्या पुढील शिक्षणासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी करत आहे.​

प्रेरणादायी प्रवास

उकळी सारख्या ग्रामीण भागातून येऊन, शारीरिक अडचणींवर मात करत प्रांजलने जो प्रवास सुरू केला आहे, तो राज्यातील हजारो दिव्यांग युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. "परिस्थिती कशीही असली तरी मनगटात जिद्द असेल तर आकाशही ठेंगणे वाटते," असा संदेशच जणू प्रांजल आपल्या कृतीतून देत आहे.

Web Title : नागपुर की प्रांजल ने विकलांगता को हराया, कला में सफलता, UPSC का सपना

Web Summary : प्रांजल सांभारे ने शारीरिक चुनौतियों के बावजूद पेंटिंग का व्यवसाय बनाया और अब UPSC की तैयारी कर रही हैं। वह 'महालक्ष्मी सरस' में अपनी कला का प्रदर्शन करती हैं, जो उनकी प्रेरणा और समाज सेवा के दृढ़ संकल्प को दर्शाती है।

Web Title : Nagpur Woman Overcomes Disability, Achieves Success in Art, Dreams of UPSC

Web Summary : Pranjal Sambhare, despite physical challenges, built a painting business and now prepares for UPSC. She showcases her art at 'Mahalakshmi Saras,' inspiring many with her resilience and determination to serve society.