लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उधारी परत न दिल्याने अट्टल गुन्हेगाराची भर चौकात हत्या करण्यात आली. मंगळवारी मध्यरात्री ही हत्या करण्यात आली. सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. अजय उर्फ अज्जू मुरलीधर गाते (३१, बैरामजी टाऊन, गोंडवाना चौक, आदिवासीनगर खदान) असे मृताचे नाव आहे.
अजयची परिसरात दहशत होती व त्यामुळे तेथील तरुण नाराज होते. त्याला जाब विचारावा असे तरुणांनी अखिलेश कंगालीला म्हटले होते. अजयने वस्तीतील काही तरुणांकडून पैसे उधार घेतले होते. आरोपी करण यादव, अमन यादव, अखिलेश कंगाली, अनुप, मुकेश यांनी त्याला पैसे परत मागितले. मात्र त्याने पैसे परत न दिल्याने त्यांच्यात जोरदार वाद झाला. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आरोपींनी त्याला गोंडवाना चौकात त्याला घेरले व त्याच्यावर चाकू तसेच दगडविटांनी हल्ला केला. आरोपींनी अजयच्या पोट, चेहऱ्यावर वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. त्याचा भाऊ अमित गाते याच्या तक्रारीवरून सदर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबविली व अखिलेश ज्ञानेश्वर कंगाली (२४, गोंडवाना चौक), अनुप उर्फ करण जय कनोजिया (२०, समतानगर, कपिलनगर), मुकेश उर्फ अमन चैतू उईके (१९, राजनगर झोपडपट्टी) यांना अटक केली.
अजयविरोधात होता संतापअजय हा अमली पदार्थांची तस्करी, अवैध दारू विक्रीच्या गुन्ह्यांत सहभागी होता. २०२१ साली जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दुहेरी हत्याकांडातदेखील त्याचे नाव आले होते. तो काही महिने कारागृहातदेखील होता. परिसरात तो दादागिरी करायचा. त्याने वस्तीतील काही तरुणांना दमदाटीदेखील केली होती. त्यामुळे त्याच्याविरोधात नाराजीचा सूर होता.