Nagpur: कॉलेजमधून घरी जाणाऱ्या तरुणीला होमगार्डने केली मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
By जितेंद्र ढवळे | Updated: November 23, 2023 18:57 IST2023-11-23T18:57:23+5:302023-11-23T18:57:38+5:30
Nagpur News: सावनेर तालुक्यातील सावळी (मोहतकर) येथे राहणाऱ्या तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी होमगार्डवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. २२) दुपारी घडली.

Nagpur: कॉलेजमधून घरी जाणाऱ्या तरुणीला होमगार्डने केली मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर - सावनेर तालुक्यातील सावळी (मोहतकर) येथे राहणाऱ्या तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी होमगार्डवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. २२) दुपारी घडली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सावली (मो) येथील भुनेश्वरी विजय मोहतकर (२०) ही सावळी फाटा येथील बसस्थानकावरून पायी चालत गावाकडे जात होती. केळवद पोलिस ठाण्यातील होमगार्ड दिगांबर ताना काकडे (२८, रा. सावळी) हे सावळी गावातून फाट्याच्या दिशेने मोटारसायकलवरून जात होते. दिगांबर याने दुचाकीवरून जात असताना मुलीच्या पाठीमागून थापड मारली आणि पुढे निघून गेला. दिगांबर हा दुचाकीवरून समोर निघून गेल्यानंतर परत तरुणीजवळ आला. त्याने डोक्यावरून हेल्मेट काढले आणि दुचाकीला टांगलेल्या फायबरच्या काठीने मुलीच्या हातावर मारायला सुरुवात केली. त्यात मुलगी जखमी झाली. जखमी अवस्थेत तिने केळवद पोलिस ठाणे गाठले. तरुणीच्या तक्रारीवरून दिगांबर ताना काकडे याच्याविरुद्ध कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी दिगांबर हा फरार आहे. ठाणेदार अमितकुमार आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोरेश्वर चलपे, शिपाई पंकज सहारे यांच्या मदतीने तपास सुरू आहे.