पैशांच्या वादातून मित्राचा दगडाने ठेचून खून; १५ दिवसातांतील नंदनवन भागातील तिसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 12:49 IST2023-08-02T12:48:51+5:302023-08-02T12:49:40+5:30

दोन आरोपींना अटक

A friend was stoned to death over a money dispute; Third murder incident in Nandanvan area of Nagpur in 15 days | पैशांच्या वादातून मित्राचा दगडाने ठेचून खून; १५ दिवसातांतील नंदनवन भागातील तिसरी घटना

पैशांच्या वादातून मित्राचा दगडाने ठेचून खून; १५ दिवसातांतील नंदनवन भागातील तिसरी घटना

नागपूर : जुन्या पैशांच्या वादातून दोन मित्रांनी संगनमत करून आपल्या मित्रालाच संपविल्याची थरारक घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी मंगळवारी मध्यरात्री १२:३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान मागील १५ दिवसात नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेला हा तिसरा खून आहे.

तुषार किशोर इंगळे (वय १७, रा. शिवाजीनगर) असे मृत युवकाचे नाव आहे, तर देवा दर्शन नाईक (वय २०) आणि रोहित चंद्रमणी शंडे (वय २३, दोघे रा. भीमचौक, पडोळेनगर) अशी आरोपींची नावे आहेत. तुषार, देवा आणि रोहित हे तिघेही चांगले मित्र होते. मृत तुषार हा इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात काम करीत होता, तर देवा आणि रोहित मजूर होते. मिळेल ते काम करून ते आपला उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, सोमवारी रात्री ते संघर्षनगर येथील दारुच्या भट्टीसमोरील रिकाम्या प्लॉटवर दारू पित बसले होते. दारु प्यायल्यानंतर तुषारसोबत देवा आणि रोहितचा जुन्या पैशांवरून वाद झाला. तुषारने देवा आणि रोहितकडून पैसे घेतले होते. ते देण्यासाठी तो टाळाटाळ करीत होता. त्यामुळे देवा आणि रोहितने दगडाने ठेचून तुषारचा खून केला.

१२ तासात आरोपींना अटक

खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. दरम्यान, सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना तुषार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी नंदनवन पोलिसांना माहिती दिल्यानंतर नंदनवन पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. नंदनवन पोलिसांनी खून झाल्यानंतर १२ तासात आरोपींना अटक केली आहे. मागील १५ दिवसात नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेला हा तिसरा खून आहे. यापूर्वी भावाने आपल्या मतिमंद बहिणीचा, तर चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यावर हातोडा मारून खून केला होता.

Web Title: A friend was stoned to death over a money dispute; Third murder incident in Nandanvan area of Nagpur in 15 days