बार्टी करणार भीम काव्यांचे संकलन

By आनंद डेकाटे | Published: April 29, 2024 06:13 PM2024-04-29T18:13:28+5:302024-04-29T18:17:46+5:30

Nagpur : बार्टी करणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित विविध भाषांमधील भीम काव्यांचे संकलन

A collection of Bhima poems by BARTI | बार्टी करणार भीम काव्यांचे संकलन

Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित विविध भाषांमधील भीम काव्यांचे संकलन करण्याचा निर्णय बार्टीने घेतला आहे. या संकलनाचा एक भव्य ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव जसा सामाजिक, आर्थिक, राजकीय सांस्कृतिक क्षेत्रावर पडला तसाच तो साहित्यिक क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणावर पडला. प्रारंभिक काळात महाराष्ट्रातील साहित्यिकांनी कविता, कथा, नाटक, आत्मचरित्र इत्यादी लेखन प्रकारातून विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी दिलेला मानवमुक्तीचा विचार हीच या साहित्याची प्रेरणा होती. मानवमुक्तीचे न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्वावर नवसमाज निर्मितीचे स्वप्न साकारण्यासाठी महाराष्ट्रातील साहित्यिकांनी जी साहित्य निर्मिती केली त्याचा प्रभाव इतर भाषिक राज्यांवरही झालेला आहे. त्यातून विविध भाषा तसेच बोलीभाषेमध्ये देखील अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात साहित्यनिर्मिती झाली आहे. हे विचार जनसामान्य माणसापर्यंत पोहचविण्यात कवी, गायक, शाहीर, साहित्यिक, कलावंतांचे मोठे योगदान आहे. या सर्वांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांनी लिहिलेल्या कविता, गझल, अभंग, अखंड, ओवी, छक्कड, शाहिरी, रुबाया, हायकू, चारोळी, भारुड, पोवाडा, लोकगीते इत्यादी सर्व काव्य प्रकारचे संकलन करून महामानव विश्वकाव्य दर्शन हा काव्यसंग्रह मोठया प्रमाणावर एकत्रित करुन संपादित करून ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचे प्रस्तावित आहे.


यासंदर्भात विविध भाषेतील काव्य निर्माण केलेले असल्यास याची प्रत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी),२८ क्वीन्स गार्डन, पुणे या पत्यावर किंवा vishwakavyabarti@gmail.com या मेल आयडीवर पाठवावे ३१ मेपर्यंत आपले काव्य पाठवावे. सदर कविता साहित्यीकांच्या नावाने बार्टी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असे बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी सांगितले.

 

Web Title: A collection of Bhima poems by BARTI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.