९२ टक्के रुग्ण दमा वाढल्यावरच डॉक्टरांकडे जातात; ३४ टक्के रुग्णांमध्ये दम्याचा विकार तीव्र  

By सुमेध वाघमार | Published: April 30, 2023 02:10 PM2023-04-30T14:10:20+5:302023-04-30T14:11:57+5:30

एकूणच ९२ टक्के रुग्ण हे दमा वाढल्यावर डॉक्टरांकडे पोहचत असल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे.

92 percent of patients go to the doctor only when their asthma flares up; 34 percent of patients have severe asthma | ९२ टक्के रुग्ण दमा वाढल्यावरच डॉक्टरांकडे जातात; ३४ टक्के रुग्णांमध्ये दम्याचा विकार तीव्र  

९२ टक्के रुग्ण दमा वाढल्यावरच डॉक्टरांकडे जातात; ३४ टक्के रुग्णांमध्ये दम्याचा विकार तीव्र  

googlenewsNext

नागपूर : वाढते प्रदुषण, सतत वातावरणातील बदल यामुळे अस्थमाचे प्रमाण वाढत आहे. मात्र, त्यापैकी केवळ ८ टक्के अस्थमाचे रुग्ण हे सौम्य विकार असताना डॉक्टरांपर्यंत पोहचतात. ५८ टक्के रुग्ण हे मध्यम विकाराच्या स्वरुपात तर, ३४ टक्के रुग्ण हे तीव्र विकार झाल्यावर पोहचतात.

एकूणच ९२ टक्के रुग्ण हे दमा वाढल्यावर डॉक्टरांकडे पोहचत असल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे. ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी अस्थमाच्या ६ हजार २५७ रुग्णांवर अभ्यास केला. त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला. २ मे हा दिवस जागतिक अस्थमा दिवस म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने त्यांनी ही माहिती दिली.

अस्थमामध्ये श्वास वाहिना आंकुचन पावतात

डॉ. अरबट म्हणाले, फुफ्फुसांच्या आत असलेल्या श्वास वाहिन्यांवर सुज आल्याने त्यांचा व्यास कमी होतो. त्यात स्त्राव वाढतो व त्यामुळे या श्वास वाहिन्या आकुंचन पावतात. अशा वेळी श्वास सोडताना त्रास होतो. एकूणच फुफ्फुसांच्या क्रियान्वयनात अडथळा आल्याने दम लागतो. या विकाराला अस्थमा असे म्हणतात. त्यामुळे पूर्वी करीत असलेले काम आता करताना जास्त श्वास भरून येत आल्यास तो अस्थमा असू शकतो. 

दम्याला कारणीभूत घटक

घरकाम करताना उडणाºया धुळीमध्येही अ‍ॅलेर्जीकारक घटक असतात, त्यामुळेही दमा होऊ शकतो. धुम्रपान देखील दम्यासाठी कारणीभूत आहे.  प्रदुषण, धुलीकण थेट फुफ्फुसात जातील असे व्यवसाय, अ‍ॅलर्जी, दीर्घकाल कफ व ब्रोन्कायटिस ही देखील दम्यास कारणीभूत ठरू शकतात. 

ही घ्या काळजी 

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सौम्य स्वरुपात का असेना वाढू लागला आहे. यामुळे अस्थमाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. याशिवाय अस्थमाचे वेळोवेळी मुल्यमापन करावे. औषधी वेळेवर घ्यावी. दम लागणे, नियमित खोकला, घशातून खरखर आवाज येणे, छाती भरून येणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. 

घरातील धुळीमुळे ४४ टक्के रुग्ण

घरी साफसफाई दरम्यान आढळणाºया ‘हाऊस डस्ट माईट’मुळे तब्बल ४४ टक्के रुग्णांचा अस्थमा ‘ट्रिगर’ झाल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे. त्यामुळे अस्थमाचा त्रास असलेल्या रुग्णांनी घराची स्वच्छता करताना विशेष काळजी घ्यावी.

वयोमानानुसार अस्थमा

२० वषाखालील वयोगट : १२ टक्के
२१ ते ३९ वयोगट : ३१ टक्के
४० वर्षावरील वयोगट : ५७ टक्के
४१ व त्यापुढील वयोगट : २५ टक्के (तीव्र अस्थमाचे रुग्ण) 
-अस्थमाला कारणीभूत घटक टाळले पाहिजे

अस्थमा विकारावर उपचार करता येतो. मात्र, अस्थमाला कारणीभूत घटक टाळले पाहिजे. वेळेत औषधे आणि इनहेलर घेतली पाहिजे. वातावरण बदलताना स्वत:ला अधिक जपावे आणि नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यामुळे दमा नियंत्रणात ठेवता येतो. 
-डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ

Web Title: 92 percent of patients go to the doctor only when their asthma flares up; 34 percent of patients have severe asthma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य