डेंटलच्या ७२ निवासी डॉक्टरांचे तीन महिन्यापासून रखडले विद्यावेतन; अखेर पुकारले ‘कामबंद’ आंदोलन
By सुमेध वाघमार | Updated: January 12, 2026 15:08 IST2026-01-12T15:07:30+5:302026-01-12T15:08:57+5:30
Nagpur : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील (डेंटल) निवासी डॉक्टरांच्या संयमाचा सोमवारी अखेर बांध फुटला.

72 dental resident doctors' salaries delayed for three months; finally 'work stoppage' called
नागपूर: शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील (डेंटल) निवासी डॉक्टरांच्या संयमाचा सोमवारी अखेर बांध फुटला. मागील तीन महिन्यांपासून हक्काचे विद्यावेतन न मिळाल्याने संतप्त झालेल्या जवळपास ७२ निवासी डॉक्टरांनी सोमवारी ‘कामबंद’ आंदोलन पुकारले. ऐन परीक्षेच्या आणि अभ्यासाच्या काळात खिशात दमडीही नसल्याने या डॉक्टरांवर उपासमारीची वेळ आली असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रुग्णसेवा वाºयावर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
'डेंटल'मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे (पीजी) तीन वर्षांचे एकूण ७२ निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. एका निवासी डॉक्टरला दरमहा सुमारे ७० हजार रुपये विद्यावेतन मिळते. याच रकमेतून त्यांना आपला दैनंदिन खर्च, मेसचे बिल आणि महागड्या वैद्यकीय साहित्याचा खर्च करावा लागतो. मात्र, आॅक्टोबर महिन्यापासून हे विद्यावेतन रखडले आहे. वारंवार विनंत्या करूनही केवळ आश्वासने मिळत आहेत. घरून पैसे मागवायचे किती दिवस? प्रशासनाला आमच्या पोटापाण्याची काळजी नाही का? असा संतप्त सवाल काही डॉक्टरांनी ‘लोकमत’कडे उपस्थित केला.
ओपन सभागृहात डॉक्टरांचा ठिय्या
'लोकमत' प्रतिनिधीने सकाळी ११.३० वाजता डेंटलला भेट दिली असताना ५०हून अधिक निवासी डॉक्टर अधिष्ठाता कक्षाच्या मागील ओपन सभागृहात ठिय्या मांडून होते. काही डॉक्टरांना या बाबत विचारले असता, त्यांनी आॅक्टोबरपासून विद्यावेतन मिळाले नसल्याचे सांगितले. मात्र, काही डॉक्टरांनी आज प्रश्न सुटेल, असे आश्वासन अधिष्ठाता डॉ. फडणाईक यांनी दिल्याचे सांगून कामबंद आंदोलन नसल्याचेही पुष्टी दिली. यावरून हे विद्यार्थी कोणाला घाबरत आहे का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. मात्र, आठवड्याचा पहिला दिवस रुग्णांची गर्दी असताना निवासी डॉक्टर मदतीला नसल्याने रुग्णांचे हाल झाले.
विद्यावेतनासाठी पाठपुरावा सुरू
या प्रकरणावर बोलताना अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांनी सांगितले की, विद्यावेतनासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे (डीएमईआर) नियमित पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भातील प्रस्ताव आधीच पाठवण्यात आला. महापालिकेची निवडणूक असल्याने पुढील आठवड्यात निवासी डॉक्टरांच्या खात्यात विद्यावेतन जमा होण्याची शक्यता आहे.