‘म्हाडा’चे फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली ४४ जणांची फसवणूक; आरोपी ‘डिल्स माय प्रॉपर्टीज’चा संचालक
By योगेश पांडे | Updated: November 19, 2025 17:12 IST2025-11-19T17:10:08+5:302025-11-19T17:12:09+5:30
कंपनी संचालकाकडून १.३९ कोटींचा गंडा : फ्लॅट, गृहकर्जाच्या नावाखाली ४४ जणांची फसवणूक

44 people were cheated in the name of getting MHADA flats; Accused is the director of 'Deals My Properties'
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘म्हाडा’चे फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली विक्री न झालेल्या सदनिकांची विक्री करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कंपनी संचालकांनेच ग्राहकांना १.३९ कोटींचा गंडा घातला. फ्लॅट तसेच गृहकर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली आरोपीने ४४ जणांची फसवणूक केली. सिताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूपेंद्र चंद्रीकापुरे असे आरोपीचे नाव असून तो ‘डिल्स माय प्रॉपर्टी’चा संचालक आहे. २०२२ मध्ये म्हाडाकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. म्हाडाच्या विक्री न झालेल्या सदनिकांची विक्री करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करायची होती. चंद्रीकापुरे याच्या कंपनीची यासाठी निवड करण्यात आली. चंद्रिकापुरेने १९ ऑक्टोबर २०२२ ते ५ जुलै २०५ या कालावधीत ४४ ग्राहकांना फ्लॅट मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्याने फ्लॅट तसेच गृहकर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून १.३९ कोटी रुपये घेतले. नियमानुसार त्याला पैसे घेण्याचे कुठलेही अधिकार नव्हते. त्याने पैसे घेतले व कुणालाही फ्लॅट मिळवून दिला नाही. हा प्रकार समोर आल्यावर ग्राहकांनी म्हाडाकडे तक्रार केली. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी केली व यात चंद्रिकापुरेचा प्रताप समोर आला. म्हाडाच्या उपमुख्य अधिकारी दक्षता विनायकराव गोळे यांच्या तक्रारीवरून चंद्रिकापुरेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.