विदर्भात आता ४ नवे अपर जिल्हाधिकारी; प्रशासकीय कार्यक्षमतेत होणार वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 16:36 IST2026-04-04T16:33:57+5:302026-04-04T16:36:13+5:30
Nagpur : राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाने महसूल विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर केला असून, तब्बल ३५ हजार ८७६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

4 new Additional District Collectors now in Vidarbha; Administrative efficiency will increase
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाने महसूल विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर केला असून, तब्बल ३५ हजार ८७६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये विदर्भाला आणखीन चार नवीन अपर जिल्हाधिकारी मिळणार आहेत. यामध्ये अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक एक नवीन स्वतंत्र अप्पर जिल्हाधिकारी पद राहणार आहे.
नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी विविध विषयांवर संवाद साधताना महसूल विभागातील मोठ्या प्रशासकीय बदलांची घोषणा केली. राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने शासनाने महसूल विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर केला असून, तब्बल ३५,८७६ पदांची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महसूल विभागाचा शेवटचा आकृतिबंध २००६ मध्ये मंजूर झाला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी नव्या आकृतिबंधासाठी अनेक आंदोलन केली होती. अखेर शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे राज्यात ११ नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये, ८ नवीन उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालये, २ नवीन तहसीलदार कार्यालये आणि ६९ अप्पर तहसीलदार कार्यालये सुरू होणार आहेत. "विकास प्रक्रियेत प्रशासकीय सुधारणा अत्यंत महत्त्वाची असते आणि आम्ही ती करून दाखवली आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच यावर्षी सुमारे ७५० अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नव्या आकृतिबंधानुसार विदर्भाला ४ अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाशिवाय ३० नवीन अप्पर तहसीलदार सुद्धा मिळणार आहेत. यामध्ये नागपूर विभागाला २०, तर अमरावती विभागाला १० नवीन अपर तहसीलदार मिळतील.
विदर्भातील नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय
अमरावती विभाग : अमरावती, अकोला, पुसद, उमरखेड, सिंदखेडराजा, मेहकर, खामगाव, वाशिम, रिसोड, कारंजा
नागपूर विभाग : नागपूर (ग्रामीण), हिंगणा, नागपूर (शहर), कामठी, सावनेर, काटोल, नरखेड, मौदा, कुही, हिंगणघाट, सेलू, पवनी, चार्मोशी, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी.