लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विभागात समाधानकारक पाऊस सुरू असल्यामूळे खरीप हंगामातील पेरणींना सुरूवात झाली आहे. खरीप हंगामामध्ये विभागातील सहाही जिल्ह्यात २ जुलैपर्यंत ३५.४२ टक्के पेरणी पूर्ण झाली असून सर्वाधिक ५८.९८ टक्के वर्धा जिल्ह्यात पेरणी झाली आहे. विभागात कापूस व सोयाबीन पीकांची सर्वाधिक पेरणी झाली आहे.
विभागात खरीप पेरण्यांमध्ये नागपूर जिल्ह्यात ४ लाख ६९ हजार ४३२ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ३० हजार ८२१ हेक्टरमध्ये (२७.८७ टक्के) पेरणी पूर्ण झाली आहे. वर्धा जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ५५४ सरसरी हेक्टरपैकी २ लाख ३९ हजार ७८१ हेक्टरमध्ये (५८.९८ टक्के) प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ४ लाख ६३ हजार ४० हेक्टरपैकी २ लाख ३९ हजार ८८० हेक्टर (५३.७५ टक्के), गडचिरोली जिल्ह्यात १ लाख ९३ हजार ८६५ सरासरीपैकी ४० हजार ९३ हेक्टर (२०.६८ टक्के) सरासरी पेरणी पूर्ण झाली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात बहुतांश क्षेत्रात भात लागवडीचे क्षेत्र आहे. विभागात सरासरी १८ लाख ९५ हजार ९१० हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ६ लाख ७१ हजार ५८४ हेक्टर क्षेत्रात सरासरी ३५.४२ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
आतापर्यंत सर्वाधिक कापसाची लागवडखरीप पेरण्यांमध्ये सर्वाधिक ६५.४९ टक्के क्षेत्रात कापूस लागवड पूर्ण झाली आहे तसेच सोयाबीन पीकांतर्गत ४०.१४ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. ज्वारी ३५.१२ टक्के, भात १०.०६ टक्के, तूर ४३.२९ टक्के, मूग ११.८५ टक्के, उडीद २६.८३ टक्के, कडधान्य ४२.५१ टक्के, तीळ ३१.१८ टक्के एकूण गळीत धान्य ३९.८९ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.
सोयाबीन पीकांतर्गत विभागात ३ लाख १४ हजार ४२७ सरासरी हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख २६ हजार १९६ हेक्टरमध्ये पेरणी पूर्ण झाली आहे. कापूस पीकांतर्गत सरासरी ५ लाख ८६ हजार ८३० हेक्टर क्षेत्रापैकी ३ लाख ८४ हजार २९६ हेक्टर म्हणजेच सरासरी ६५.४९ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.