३४ लाखांची निष्कृष्ट सुपारी जप्त

By Admin | Updated: June 15, 2015 03:02 IST2015-06-15T03:02:20+5:302015-06-15T03:02:20+5:30

निकृष्ट सुपारीची विक्री करणाऱ्या इतवारीतील एका विक्रेत्यांवर पोलीस आणि अन्न विभागाच्या वतीने संयुक्त कारवाई केली.

34 lakhs worth of merchandise seized | ३४ लाखांची निष्कृष्ट सुपारी जप्त

३४ लाखांची निष्कृष्ट सुपारी जप्त

नागपूर : निकृष्ट सुपारीची विक्री करणाऱ्या इतवारीतील एका विक्रेत्यांवर पोलीस आणि अन्न विभागाच्या वतीने संयुक्त कारवाई केली. विकास एक्स्पोर्ट असे फर्मचे नाव असून विकास विजय चौरसिया संचालक आहेत. त्याच्याकडून सुमारे ३४ लाख रुपये किमतीची २४ टन सुपारी जप्त केली. ही विषारी सुपारी नागपुरात खर्रा तयार करण्यासाठी उपयोगात येत होती, हे विशेष.
प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई शनिवारी रात्री केली तर रविवारी सकाळी अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी माल ताब्यात घेतला. कारवाई रविवारी दिवसभर सुरू होती. लकडगंज पोलिसांनी शिवसेनेच्या युवा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे विकास चौरसियाच्या वर्धमाननगर येथील आॅक्ट्रॉय झोन-३ येथील गोदामावर धाड टाकली आणि सील ठोकले. त्यापूर्वी नायजेरिया देशातून आयात केलेल्या सुपारीचा कंटेनर (एमएच-४० वाय ४४४७) गोदामात खाली करण्यात आला होता. लकडगंज पोलिसांनी विकास चौरसिया याच्याविरुद्ध कारवाई सुरू केली, त्याचवेळी शिवसेनेच्या युवा शाखेचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले. चौरसियाने माल आपला असून आयातीचा परवाना असल्याचा दावा केला. पण कोणतीही कागदपत्रे न दाखविल्याने पोलिसांचा संशय बळावला. अखेर पोलिसांनी गोदामाला सील ठोकले.(प्रतिनिधी)
निकृष्ट सुपारीची सर्रास विक्री
महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू आणि सुपारीवर बंदी असतानाही चोरट्या मार्गाने आवक सुरू आहे. विदर्भात मिळणारा खर्रा हा निकृष्ट सुपारी आणि सुगंधित तंबाखूपासून तयार केला जातो. यात निकृष्ट सुपारीचा सर्रास उपयोग केला जातो. यापूर्वीही नायजेरियातून कोट्यवधींची सुपारी आयात केल्याची माहिती असून टोळी नागपुरात सक्रिय आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी पोलिसांना माहिती दिल्यामुळेच माल हाती लागला, अन्यथा या सुपारीची शहरात विक्री झाली असती. लकडगंज ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निकम आणि अन्न प्रशासन विभागातर्फे सहआयुक्त शिवाजी देसाई, सहायक आयुक्त नरसिंह वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अभय देशपांडे आणि जी.के. वसावे यांनी कारवाई केली.

Web Title: 34 lakhs worth of merchandise seized