२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 06:23 IST2025-10-24T06:21:58+5:302025-10-24T06:23:20+5:30
प्रकल्पाच्या जागेची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एसडीएएल’चे संस्थापक अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांना प्रदान केली.

२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मिहानच्या ‘एसईझेड’मध्ये २२३ एकरांवर १२,७८० कोटींच्या गुंतवणुकीतून सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेड अत्याधुनिक संरक्षण उपकरण निर्मिती प्रकल्प उभारणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या उत्पादन क्षमतेसह उभा राहणारा हा प्रकल्प नागपूरला आंतरराष्ट्रीय संरक्षण नकाशावर ठळक स्थान देईल, ही गुंतवणूक विदर्भाच्या औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
रामगिरी येथे झालेल्या छोटेखानी समारंभात प्रकल्पाच्या जागेची कागदपत्रे फडणवीस यांनी ‘एसडीएएल’चे संस्थापक अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांना प्रदान केली. या कार्यक्रमात सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष नुवाल, राघव नुवाल, सोलरचे वरिष्ठ अधिकारी जे. एफ साळवे आदी उपस्थित होते.
‘मेक इन इंडिया’ प्रकल्प
फडणवीस म्हणाले, हा उपक्रम ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमांना चालना देत, महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी दिशा देईल. नागपूरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे संरक्षण व दारूगोळा उत्पादन केंद्र म्हणून ओळख मिळणार असून, राज्याच्या औद्योगिक आणि रणनीतिक प्रगतीत मोठी भर पडणार आहे.