२१ टक्के कंपन्यांचेच कामकाज ‘स्टार्ट’
By Admin | Updated: January 10, 2015 02:38 IST2015-01-10T02:38:18+5:302015-01-10T02:38:18+5:30
गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या ‘मिहान’ प्रकल्पात गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी याकरिता अद्यापही फारसे पोषक वातावरण निर्माण झालेले नाही.

२१ टक्के कंपन्यांचेच कामकाज ‘स्टार्ट’
नागपूर : गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या ‘मिहान’ प्रकल्पात गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी याकरिता अद्यापही फारसे पोषक वातावरण निर्माण झालेले नाही. येथील ‘सेझ‘मध्ये (स्पेशल इकॉनॉमिक झोन) ५५ कंपन्यांना जमीन देण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात यातील केवळ २१ टक्केच म्हणजे १२ कंपन्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. गुंतवणूकदार कंपन्यांच्या उभारणीचा हा वेग राहिला तर ‘मिहान’च्या माध्यमातून विकासाची झेप घेण्यासाठी नागपूरला आणखी अनेक वर्षे लागू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ‘मिहान’मध्ये नेमक्या किती कंपन्यांचे काम सुरू झाले आहे व इतर कंपन्यांची नेमकी काय स्थिती आहे यासंदर्भात ‘एमएडीसी’कडे (महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपेन्ट कंपनी) विचारणा केली होती. यावर ‘एमएडीसी’चे जनमाहिती अधिकारी सी.जे.बनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ‘सेझ’मध्ये गुंतवणूक केलेल्यांपैकी केवळ १२ कंपन्यांनीच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली आहे. तर १० कंपन्यांचे बांधकाम सुरू आहे.
‘मिहान’मध्ये ‘सेझ’च्या बाहेर १४ कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. यातील प्रत्यक्षात तीनच समूहांकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. सात कंपन्यांकडून प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. तर देशातील आणखी १० कंपन्यांनी ‘मिहान’मध्ये ‘युनिट’ सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. (प्रतिनिधी)