२१ अवैध प्रवासी वाहने जप्त

By Admin | Updated: July 4, 2014 01:08 IST2014-07-04T01:08:42+5:302014-07-04T01:08:42+5:30

शहरात अवैध प्रवासी घेऊन धावत असलेली २१ वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने जप्त केली. यात १२ टाटा मॅजिक, चार जीप तर पाच बसेस आहेत. चार दिवसांच्या उसंतीनंतर पुन्हा सुरू

21 illegal migrant vehicles seized | २१ अवैध प्रवासी वाहने जप्त

२१ अवैध प्रवासी वाहने जप्त

आरटीओची कारवाई : लोकमतच्या वृत्ताची दखल
नागपूर : शहरात अवैध प्रवासी घेऊन धावत असलेली २१ वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने जप्त केली. यात १२ टाटा मॅजिक, चार जीप तर पाच बसेस आहेत. चार दिवसांच्या उसंतीनंतर पुन्हा सुरू झालेल्या कारवाईने अवैध प्रवासी वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे.
‘लोकमत’ने २५ जून बुधवारच्या अंकात ‘मृत्यूचा महामार्ग कामठी’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तामुळे खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेऊन आरटीओ शहर कार्यालयाने ही कारवाई केली.
नागपूर- कामठी या मार्गावर पोलिसांसमक्ष मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. टाटा मॅजिक, अ‍ॅपे, सहासीटर अशा साधारण ३०० वाहनातून ही अवैध वाहतूक बिनधास्त सुरू आहे. विना परमीट त्यातही सहा सिट्सची परवानगी असताना १५-२० प्रवासी बसवून भन्नाट वेगाने ही वाहने धावत आहेत. नियमानुसार या वाहनांना टप्पा वाहतूक करता येत नाही. असे असतानाही व्हेरायटी चौक ते कामठी मार्गावरील सर्व चौकांतून प्रवासी घेताना दिसतात. एलआयसी चौकात तर यांचा स्टॅण्ड आहे. पोलिसांच्यासमोर ही वाहतूक सुरू असतानाही कारवाई नावापुरतीच असल्याचे चित्र आहे. हे वृत्त प्रकाशित होताच आरटीओ शहर कार्यालयाने याची दखल घेतली. २६ जून रोजी कामठी व इतर मार्गावरील १४ अवैध प्रवासी वाहने जप्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाहनांवर ही पहिल्यांदाच कारवाई झाल्याचे बोलले जात असताना आज गुरुवारी झालेल्या कारवाईत २१ वर वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: 21 illegal migrant vehicles seized