मोबाईल घेऊन देण्यास वडिलांचा नकार, मुलाने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 14:09 IST2023-07-17T14:06:56+5:302023-07-17T14:09:35+5:30
उमरेड येथील धक्कादायक घटना

मोबाईल घेऊन देण्यास वडिलांचा नकार, मुलाने उचललं टोकाचं पाऊल
उमरेड (नागपूर) : दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याने क्षुल्लक कारणावरून गळफास लावत आपली जीवनयात्रा संपविली. उत्सव नरेंद्र गडबोरीकर (१५, रा. इतवारीपेठ, उमरेड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उत्सवचे वडील मोलमजुरीचे काम करतात. परिस्थिती हलाखीची असून, मुलाचे दहावीचे वर्ष असल्याने त्याने अभ्यासाकडे लक्ष द्यावे, असे कुटुंबीयांना वाटत होते. उत्सव हा मागील काही वर्षांपासून मोबाइलच्या आहारी गेला होता. अभ्यास सोडून तो केवळ आपल्या आईजवळील मोबाइल सतत वापरायचा. यावरून अनेकदा कौटुंबिक वातावरणही बिघडले होते.
उत्सव वारंवार वडिलांना नवीन मोबाइलची मागणी करीत होता. दहावीचे वर्ष असल्याने त्यांनी यासाठी नकार दर्शविला. मोबाइल घेऊन न दिल्याचा राग धरून उत्सवने घरातील लाकडी मयालीला दुपट्ट्याने गळफास लावला. मध्यरात्री वडिलांना जाग आल्यानंतर त्यांना उत्सव गळफास लावून मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. उत्सव हा मोबाइलच्या आहारी गेला होता. यामुळे त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. पालक आणि मुलांमध्ये संवाद हरवला आहे. पालकांनी आपल्या मुलांसोबत बोलते झाले पाहिजे, असे मत पोलिस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी व्यक्त केले.
मोबाइल मुलांना पूर्णतः बॅन करू शकत नाही. मुलांनी ही अभ्यास, उपयुक्त माहिती यासाठी वापर करावा. किती काळ वापरायचा हे ठरवून घ्या. मोबाइल हाताळताना काही बाबी मन विचलित करणाऱ्या ठरतात. असे होऊ देऊ नका. मित्र, कुटुंबीयांशी संवाद साधा.
- प्रशांत सपाटे, कार्यवाह, जीवन शिक्षण मंडळ, उमरेड.