नकली दागिने देत १५ ग्राहकांनी घेतले 'गोल्ड लोन' ! सुवर्ण तपासनीत, ज्वेलरविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:49 IST2025-01-22T16:48:26+5:302025-01-22T16:49:14+5:30
Nagpur : ७६ लाखांनी शिक्षक सहकारी बँकेची फसवणूक

15 customers took 'gold loans' by giving fake jewellery! Gold probe, case against jeweller
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नकली दागिने देत १५ ग्राहकांनी सुवर्णकर्ज मिळवत शिक्षक सहकारी बँकेची फसवणूक केली आहे. या आरोपींनी बँकेकडून ३७ लाखांचे कर्ज घेतले होते व व्याजासह हा आकडा ७६ लाखांवर पोहोचला होता. कर्ज न फेडल्यामुळे गहाण ठेवलेल्या दागिन्यांची चाचपणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी कर्ज देण्याच्या वेळी ज्या ज्वेलर्सने सुवर्ण तपासनीस म्हणून काम करत दागिने योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता, त्याच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे बँक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात शिक्षक सहकारी बँकेच्या मेडिकल चौक शाखेतील व्यवस्थापक गिरीश आंबोकर यांनी तक्रार केली आहे. तत्कालीन सुवर्ण तपासनीस अनिल रामचंद्र उरकुडे आणि ग्राहक नरेश खंडारे, खेमीन प्रकाश शाहू, रीमा प्रशांत मिसाळ, रोहित दामोदर धार्मिक, गौरव तारासिंग काळे, अंकुश प्रकाशराव अडुळकर, देवेंद्र सुरेशराव तुमाने, आशीष प्रकाश टेटे, अमित सुभाष मदने, मनीषा राजेंद्र फाये, राजेंद्र वसंतराव फाये, नूतन दिनकरराव भोयर, कुणाल मोहन डाखोळे, प्रतीक मनोहरराव गुरव, प्रणय गजानन वाझे अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी मार्च २०१६ ते जुलै २०१८ या कालावधीत सुवर्ण कर्ज घेतले होते. त्यांनी गहाण ठेवलेल्या दागिन्यांची सुवर्ण तपासनीस अनिल उरकुडे यांनी तपासणी केली होती व ते खरे दागिने असल्याचा निर्वाळा दिला होता. तसे प्रमाणपत्रदेखील दिले होते. मात्र, १५ ग्राहकांनी कर्जाची रक्कमच न फेडल्याने बँकेकडून त्यांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. त्याचे कुठलेही उत्तर न आल्यामुळे बँकेने आणखी एका सुवर्ण तपासनिसाकडून तपासणी केली. त्यात हे दागिने बनावट असल्याची बाब समोर आली. हे सर्व सुवर्णखाते एनपीए झाले होते. व्यवस्थापक गिरीश आंबोकर यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेतील तत्कालीन अधिकारीदेखील सहभागी ?
संबंधित आरोपी सुवर्ण तपासनिसाची नियुक्ती २०१० साली झाली होती. त्याने ४१० सुवर्ण कर्जधारकांच्या दागिन्यांची तपासणी केली होती. हा प्रकार इतके वर्ष समोर न आल्यामुळे विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. बँकेतील तत्कालीन अधिकारीदेखील यात सहभागी आहे का या दिशेनेदेखील तपास होणार आहे.