१११ गायक करणार गायनाचा विक्रम ! ७ डिसेंबरला नागपुरात होणार अनोखा विक्रम
By नरेश डोंगरे | Updated: November 22, 2025 20:32 IST2025-11-22T20:31:00+5:302025-11-22T20:32:19+5:30
महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड : ७ डिसेंबरला घालणार गवसणी

111 singers to set a singing record! A unique record will be set in Nagpur on December 7th
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक विश्वविक्रम करणाऱ्या नागपूरकरांनी आता पुन्हा एका विक्रमाला गवसणी घालण्याचा निश्चय केला आहे. त्यानुसार, ७ डिसेंबर २०२५ ला ठीकठिकाणचे १११ गायक-गायिका नागपुरात येऊन गायनाचा एक अनोखा विक्रम करणार आहेत. या विक्रमाची माहिती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त गायक सुनीलकुमार वाघमारे यांनी आज पत्रकारांना दिली.
केवळ महाराष्ट्रच नव्हे तर विविध प्रांतांत गायनाचे अनेक कार्यक्रम करणारे सुनीलकुमार वाघमारे यांनी गेल्या १३ वर्षांत गिनीजसह ८ वेगवेगळे विक्रम केले आहेत. त्यांच्यासह अनेक स्थानिक कलावंतांनीही वेगवेगळे विक्रम करून नागपूरच्या शिरपेचात विक्रमाचे तुरे खोवले आहेत. श्री संती गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळ, डॉ. दंदे फाउंडेशन आणि पद्मश्री मोहम्मद रफी सांस्कृतिक मंच नागपूरच्यावतीने ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड’ या गायनाच्या विक्रमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यात मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, तमीळ, तेलगू, पंजाबी, भोजपुरी, राजस्थानीसह देशातील विविध भाषेतील गाणी गायली जाणार असल्याचे वाघमारे आणि संजय चिंचोळे यांनी सांगितले.
७ डिसेंबरला सकाळी ८ वाजता शिक्षक सहकारी बँकेचे सभागृह, गांधी सागर तलावाजवळ, महाल येथे या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. आतापर्यंत या कार्यक्रमासाठी ७० गायक-गायिकांनी नावे नोंदविली असून, आणखी ४१ जणांना संधी आहे. कुठल्याही गाव, शहरातील कोणताही गायक, गायिका यात सहभागी होऊ शकतात, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.