दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवारपासून, गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता पथक तैनात
By आनंद डेकाटे | Updated: July 14, 2024 18:46 IST2024-07-14T18:45:36+5:302024-07-14T18:46:09+5:30
परीक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याकरिता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततापूर्ण वातावरणात परीक्षा पार पाडणे आवश्यक आहे.

दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवारपासून, गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता पथक तैनात
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणारी दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. १२वीची परीक्षा १६ जुलै ते ६ ऑगस्ट, तर दहावीची परीक्षा १६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत होणार आहे.
परीक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याकरिता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततापूर्ण वातावरणात परीक्षा पार पाडणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर कोणतेही गैरप्रकार व आवारात गर्दी टाळणे, महत्त्वाच्या विषयाच्या पेपरच्या दिवशी उपद्रवी केंद्रांना आकस्मिक भेटी देऊन गैरप्रकारांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनातील पाच अधिकाऱ्यांचे दक्षता पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात स्त्री प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.
परीक्षा कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील सर्व परीक्षा केंद्रांवर मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये, परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी १६ जुलै रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते ६ ऑगस्ट २०२४ रात्री ८ वाजेपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या परिसरात व त्यासभोवतालच्या १०० मीटर परिसरात परीक्षेशी संबंधित असलेल्या शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, आदींना वगळून इतर कोणत्याही खासगी व्यक्तींना परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्यासाठी आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे.
परीक्षा केंद्रावर मोबाइल, वायरलेस सेट, ट्रांझिस्टर, रेडिओ, कॅलक्यूलेटर, लॅपटॉप व तत्सम इतर साधने परीक्षा केंद्रावर जवळ बाळगण्यास व परिसरातील १०० मीटर सभोवतालच्या परिसरात वापरण्यास मनाई करण्याचा आदेश लागू करण्यात आला आहे.