नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेगाडीतून रेल्वे सुरक्षा दलाने ९,१८० रुपये किमतीच्या १०८ दारूच्या बॉटल जप्त केल्या आहेत.
गोरखपूर-त्रिवेंद्रम विशेष रेल्वेगाडी सकाळी ५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफाॅर्म क्रमांक २ वर आली. यावेळी आरपीएफच्या टीममधील सदस्य सीताराम जाट, नरेंद्र कुमार, सचिन सिरसाठ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चमूला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या गाडीची तपासणी करण्यात आली. दरम्यान गोरखपूर-त्रिवेंद्रम विशेष रेल्वेगाडीच्या एस ५ कोचमध्ये एक बेवारस बॅग आढळली. बॅगबाबत आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. ही बॅग आरपीएफ ठाण्यात आणून पंचासमक्ष उघडली असता त्यात मध्य प्रदेशात तयार झालेल्या विदेशी दारूच्या १०८ बॉटल आढळल्या. आरपीएफचे निरीक्षक आर. एल. मीणा यांच्या आदेशानुसार जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.