अंत्यविधीला आले नातेवाईक; साजरा केला वाढदिवस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 08:18 IST2026-01-14T08:17:47+5:302026-01-14T08:18:00+5:30
अंत्यविधीऐवजी नातेवाइकांनी आजीबाईचा वाढदिवस साधेपणाने साजरा केला.

अंत्यविधीला आले नातेवाईक; साजरा केला वाढदिवस!
रामटेक (जि. नागपूर): नाव गंगाबाई सावजी साखरे... वय वर्षे १०३... दोन महिन्यांपासून अंथरुणाला खिळलेल्या... दोन चम्मच पाण्यावर दिवस काढणे सुरू होते. मृत्यूची वार्ता नातेवाइकांपर्यंत पसरली. अंत्यविधीची तयारी पूर्ण झाली. हातापायांची बोटे बांधण्यात आली. अचानक आजीबाईने पायाची बोटे हलवली. त्या जिवंत असल्याचे समजले. विशेष म्हणजे, आजीबाईचा १३ जानेवारी हा वाढदिवस होता. त्यामुळे अंत्यविधीऐवजी नातेवाइकांनी आजीबाईचा वाढदिवस साधेपणाने साजरा केला. गंगाबाई या मूळच्या चारगाव (ता. रामटेक) येथील रहिवासी. सध्या रामटेकच्या आंबेडकर वॉर्डात मुलगी कुसुमा अंबादे यांच्या घरी राहतात. १२ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता त्यांच्या शरीराच्या हालचाली थांबल्याचे दिसताच, कुटुंबीयांनी त्यांना मृत समजले होते.
आजीबाईला मिळाले नवजीवन
निधनाची वार्ता मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर, बालाघाटसह दूरच्या भागांतून नातेवाईक रामटेककडे निघाले होते. काही जण तर हार घेऊन पोहोचले. मात्र, आजी जिवंत पाहून सगळेच स्तब्ध झाले. विशेष म्हणजे, १३ जानेवारी रोजी गंगाबाईंचा वाढदिवस होता. या घटनेनंतर त्यांना जणू नवजीवन मिळाले. कुटुंबीयांकडून साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात आला. काही महिन्यांपूर्वीपर्यंत तांदूळ निवडण्याइतकी दृष्टी चांगली असलेल्या गंगाबाईची ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.