लग्न केलं तेच चुकलं, असं कुणाला वाटतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 12:18 IST2026-01-25T12:16:17+5:302026-01-25T12:18:14+5:30
Relationship News: प्रेसिया नावाच्या एका जपानी मॅचमेकिंग कंपनीचा जानेवारी २०२६ मधील हा सर्व्हे आहे. या कंपनीने देशातील २० ते ५९ या वयोगटांतील २८७ विवाहित महिलांना प्रश्न विचारला. तुम्हाला तुमच्या पतीशी लग्न केल्याचा पश्चात्ताप होतो आहे का?, यावर ७० टक्के महिलांनी हो, असे उत्तर दिले. तसे हे उत्तर अनपेक्षित आणि आश्चर्यकारक होते,

लग्न केलं तेच चुकलं, असं कुणाला वाटतं?
- चंद्रकांत कित्तुरे
(वृत्तसंपादक, कोल्हापूर)
'तुझ्याशी लग्न केलं तेच चुकलं, पश्चात्ताप होतोय आता याचा. अनेकजण सांगत होते करू नको, पण म्हटलं नाही हाच माझ्या आयुष्याचा जोडीदार, आवडला होतास तू मला. तुझं वागणं, बोलणं, राहणं, दिसणं सगळं कसं सतत हवहवसं वाटायचं, पण लग्नानंतर तुझे खरे रूप दिसू लागलं. अन् हाच का मला आवडलेला तू? असा प्रश्न पडू लागला. पण, नाही आता हे असह्य झालंय, आपण वेगळं झालेलंच बरं', अशा शब्दांत बायको नवऱ्याला सुनावत होती अन् नवरोबा चुपचाप ऐकत होते. या दोघांचा प्रेमविवाह होता अन् लग्नाचे नऊ दिवस संपताच त्यांच्यात खटके उडू लागले होते.
हा संवाद आठवण्याचे कारण म्हणजे जपानमध्ये नुकताच झालेला एक सर्व्हे. प्रेसिया नावाच्या एका जपानी मॅचमेकिंग कंपनीचा जानेवारी २०२६ मधील हा सर्व्हे आहे. या कंपनीने देशातील २० ते ५९ या वयोगटांतील २८७ विवाहित महिलांना प्रश्न विचारला. तुम्हाला तुमच्या पतीशी लग्न केल्याचा पश्चात्ताप होतो आहे का?, यावर ७० टक्के महिलांनी हो, असे उत्तर दिले. तसे हे उत्तर अनपेक्षित आणि आश्चर्यकारक होते, कारण १० पैकी सात महिला त्यांच्या वैवाहिक जीवनात सुखी नव्हत्या. नवऱ्याची कमाई, त्याच्या सवयी, दोघेही नोकरी करत असल्याने नवऱ्यानेही संसारात समानच नाही तर काहीवेळा जास्तीचा हातभार लावावा, असे वाटणे, किरकोळ गोष्टींवरून चीडचीड, संशय घेणे, लग्नाआधी सुखी संसाराची जी स्वप्ने पाहिली होती, ती प्रत्यक्षात न येणे, अशी अनेक कारणे यामागे होती.
कुटुंबव्यवस्थेसाठी चिंताजनक स्थिती
१२ कोटी लोकसंख्या असलेल्या जपानमधील ९३ टक्के लोकसंख्या शहरी आहे. शिवाय केवळ २८७ महिलांच्या सर्व्हेवरून संपूर्ण देशातील विवाहित महिलांबाबत असाच निष्कर्ष काढणे कदाचित चुकीचे ठरेल. पण औद्योगिकदृष्ट्या प्रगत जपानमधील महिलांचे भावविश्व उदासीनतेकडे तरी चाललेले नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. हा प्रश्न कुटुंबव्यवस्थेसाठी चिंताजनक आहे, हे निश्चित.
भारतात असा सर्व्हे होईल?
१. एकदा लग्न झाले की, तोच आयुष्याचा जोडीदार. तो कसाही असला तरी त्याच्याशी जमवून घेत आयुष्य काढायचे, अशा विचारांचा पगडा असलेल्या भारत देशातील विवाहित महिला त्यांच्या संसारात सुखी आहेत का?, असा विचारही कधी कुणी केला नसेल. त्यामुळे जपानसारखा सर्व्हे अद्याप तरी भारतात झालेला नाही.
२. भारतातील ६५ ते ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. भारतीय समाजात पतीला परमेश्वर मानले जाते. पती, सासरच्या मंडळींकडून सुख मिळो न मिळो एकदा लग्न झाले की, त्याच पुरुषाशी संसार करण्यात इतिकर्तव्यता, असे महिला समजतात. त्यामुळे लग्न करून पश्चावले, अशी मानसिकता किमान अरेंज मॅरेजमध्ये तरी नसते. झाली तरी तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्या सहन करत असतात.
३. शहरी भारतात लिव्ह इनचे, प्रेमविवाह करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. करिअर, आवडी-निवडीला प्राधान्य दिले जाते. पतीने घरकामात बरोबरीने मदत करावी असे नोकरी, व्यवसाय करणाऱ्या तरुणींना वाटते. त्यांना त्यांची स्पेस जे तरुण देतात, त्यांचा संसार सुखी होत आहे.
लग्न करायचे, पण स्वतंत्र राहायचा वाढतोय ट्रेंड
लग्न करूनही एकत्र न राहता स्वतंत्र राहण्याचा ट्रेंड जपानमध्ये वाढत आहे. बंधने कमीत कमी म्हणजेच मी कसं जगायचं, कसं राहायचं, याचं स्वातंत्र्य मला असले पाहिजे, अशी भावना जपानमधील युवा पिढीत वाढत आहे. त्यातून 'विवाहित, पण विभक्त' ही संकल्पना तिथे लोकप्रिय होत आहे. कायदेशीररीत्या विवाहित असल्याने भावनिक जवळीकता जपता येते, त्याचबरोबर स्वातंत्र्यही अबाधित राहते. करिअर, आवडी-निवडी, छंद जोपासत जीवनसाथीला प्रेम आणि पाठबळ देऊ करणारी, अशी ही व्यवस्था आहे.