तात्यांचं माडगूळप्रेम..!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 07:00 AM2019-09-01T07:00:00+5:302019-09-01T07:00:02+5:30

प्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर (तात्या) यांचा अठरावा स्मृतिदिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने तात्यांच्या माडगूळ गावाशी असलेल्या ऋणानुबंधाच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा...

Tatya's madgul love..! | तात्यांचं माडगूळप्रेम..!

तात्यांचं माडगूळप्रेम..!

googlenewsNext

योगेश्वर माडगूळकर-  

श्रावण महिना आला की व्यंकटेश माडगूळकर ऊर्फ तात्या हक्काची रजा टाकून माडगूळला येत होते. तात्या येणार म्हटले, की बामणाच्या पत्र्याला दिवाळीचे दिवस यायचे. केअरटेकर म्हादा मंडले, भाऊ राक्षे, भगवान चव्हाण, तात्यांचे कनिष्ठ बंधू श्यामकाका, पुतण्या अ‍ॅड. रवींद्र यांची धांदल उडायची. त्या काळी फोनची सुविधा नव्हती. तात्याची मी उद्या येतोय, अशी तार यायची. तात्या येणार त्या दिवशी श्यामकाका गावाकडील वाहकालाच पुण्याची ड्यूटी द्या, म्हणून एसटीच्या आगार व्यवस्थापकाकडे आग्रह धरायचे. मग कधी गावातील मुरला कंडक्टर, तर कधी बाळू कंडक्टर यांची ड्यूटी लागायची. आटपाडी आगारात त्या काळी डेपो मॅनेजर असणारे आबासाहेब देशमुख हक्काने आणि प्रेमाने हे काम करायचे. तात्या येणार म्हटल्यावर मायणीतील तलावात पक्षी बघायला जाण्याचा एक दिवस आबासाहेब राखून ठेवायचे. तात्यांना आणण्यासाठी आटपाडी स्टॅन्डवर गावातील अनेक लोक जमायचे. त्यात पांडुरंग सरपंच, दत्तोबा डायरेक्टर, चेअरमन दादा, रामतात्या, मनू पेंटर, तुळशीराम अण्णा, म्हादानाना यांच्यासह गाावातील राजकीय नेत्यांचा सहभाग असायचा. मग तात्यांच्या सेवेसाठी दाखल झालेल्या खास चारचाकीतून तात्यांचे आगमन व्हायचे. बराच वेळा सोबतीला चित्रपट दिग्दर्शक बाबा पाठक असायचे. तात्या आले, की त्यांना आसपासच्या गावातून निमंत्रणं येत होती. प्रत्येकाला तात्यांचा सत्कार करावा, त्यांचे पाय गावाला लागावेत, ही अपेक्षा असायची. पण व्यस्त वेळापत्रकातून तात्या सर्वांना वेळ देऊ शकत नव्हते. पुढच्या वेळी नक्की म्हणून तात्या वेळ मारून न्यायचे.
तात्या सकाळी लवकर उठून ते रानात फेरफटका मारायचे. जनावरांना गोंजारायचे, हे पाहून कधी काळी तात्या शिकारी होते, याचा आम्हा मुलांना क्षणभर विसरच पडायचा. जनावरे जर अस्वच्छ असली किंवा त्यांच्या अंगावर गोचीड दिसले तर चाकरीला असणाºया नोकरांची खैर नसायची. तात्यांचा मुक्काम म्हणजे चाकरीवरच्या नोकरांवर दडपणाचे दिवस असायचे. तात्या दुपारी गावात असणाºया त्यांच्या निवासस्थानी यायचे. शांतपणे घरी बनविलेली चटणी, बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी असे जेवण उरकून पुन्हा बामणाचा पत्रा असा त्यांचा प्रवास असायचा. दुपारच्या वेळी ते त्यांची चित्रकलेची आवड जोपासायचे. दूरहून दिसणारे खंडोबाचे मंदिर, शेतकºयांची धांदल हे हुबेहूब चित्र काढायचे. त्यात आकर्षक रंग भरायचे आणि मोठ्या आवाजात म्हादा, अरे चहा कर, असे म्हणून गरमागरम चहा प्यायचे. मग ऊन खाली आले की इंजिनचा मळा, खंडोबाचे दर्शन आणि घरासमोर गप्पा मारत बसणे हा त्यांचा आवडता छंद होता. 
तात्यांच्या मुक्कामात त्यांचे जुने सवंगडी यायचे. त्यांच्याबरोबर तात्यांच्या शिकारीच्या गप्पा रंगायच्या. लोटेवाडी कुरणात केलेला सशाचा पाठलाग, असे अनेक किस्से रंगायचे. तात्यांचे शिक्षण आटपाडीत झाले. त्यांना नाईक मास्तर ( माजी राज्यपाल राम नाईक यांचे वडील) मुख्याध्यापक होते. तात्या गावाजवळील दिघंची येथे रोज तमाशा बघायला जात आणि नंतर दुसºयादिवशी वेळेवर शाळेलाही येत. एक दिवशी नाईक मास्तर यांनी तात्यांना स्टेजवर उभे केले आणि एका महान व्यक्तीची ओळख करून देतो, असे सांगत रात्रभर तमाशा बघून दिवसा वेळेवर शाळेवर येणारा हा विद्यार्थी आहे,असे सांगितले. हा किस्सा तात्या रंगवून सांगत आणि त्यामुळेच मी सांगते ऐका लिहू शकलो, असे सांगत. तात्यांनी माणदेशातील निसर्ग सातासमुद्रापार नेला. तेथील निसर्गावर तात्यांचे प्रेम होते. श्यामकाका यांना लिहिलेल्या एका पत्रात तात्या म्हणतात की ‘माणदेशातील उन्ह पण मला सावलीसारखे आहे.’ 
तात्यांचा गावहून परतीचा प्रवास पण भावनिक असायचा. तात्या पुण्याला परत जाणार म्हटले की ज्याप्रमाणे माहेरवाशिणीला सोडायला गाव वेशीवर येतो. त्याप्रमाणे तात्यांना सोडण्यासाठी जनसागर यायचा. प्रत्येकाचे डोळे आसवांनी भरायचे. तात्या लवकरच परत यायचे, आश्वासन देऊन पुण्याच्या दिशेने प्रवास करायचे. मुंबई येथील एका महाविद्यालयातील एक प्राध्यापक तात्यांकडे गेले होते. त्या प्राध्यापकांचा जन्म मुंबईत झाला होता. ग्रामीण भागाशी कधीच संबंध आला नव्हता. तात्यांच्या कथा शिकविताना ग्रामीण शब्दांशी त्यांना लढावे लागत होते. बाटुक, चगळ, बांध यांसारखे शब्द त्यांना उमगत नव्हते. अखेर त्या प्राध्यापकांनी तात्यांच्या पुण्यातील अक्षर बंगल्याचा दरवाजा ठोठावला आणि ग्रामीण शब्दांची विचारणा केली. तात्यांनी त्यांना सल्ला दिला तुम्ही गावाकडे  जावा, तिथे तुम्ही सर्व डोळ्यांनी पाहा. तात्यांचे ते शब्द ऐकून प्राध्यापकमहोदय माडगूळला आले. 
म्हादा मंडले, श्यामकाका, रवींद्र, मुक्तेश्वर यांनी माडगूळचा निसर्ग फिरून दाखविला. हा भाग दुष्काळी असला तरी शब्दांचे पीक मोठे आहे, असा शेरा त्यांनी दिला. तात्यांनी माडगूळजवळ असणाºया लेंगरवाडी परिसरावर बनगरवाडी नावाची कादंबरी लिहिली. त्यावर नंतर चित्रपटपण निघाला. माणदेशी माणसातून त्यांनी माणदेशातील व्यक्तिचित्रे रेखाटली. तात्यांचे तब्येतीमुळे माडगूळला येणे-जाणे कमी झाले होते. २८ ऑगस्ट २००१ ची सकाळ उजाडली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होण्याआधीच तात्या गेले, असा निरोप श्रीधर माडगूळकर यांचा आला. गाव शोकसागरात बुडाला. तात्यांनी रेखाटलेला गावाचा परिसर अजूनही तसा आहे. पण त्या परिसराला तात्यांचा पदस्पर्श होत नाही. तात्या तुम्ही परत कधी येणार अशीच आर्त हाक गावाची काळी माती देत आहे. पण ते आता शक्य नाही. झालेत बहू, होतील बहू परंतु यासम हा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली.    

(लेखक लोकमत पुणे आवृत्तीत उपसंपादक आहेत.) 

Web Title: Tatya's madgul love..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.