गंगेच्या पात्रातील मुलतानी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 06:00 AM2021-03-14T06:00:00+5:302021-03-14T06:00:02+5:30

..अखेर पंडितजींनी सगळी वाद्यं थांबवली आणि क्षणभरानंतर मुलतानी रागाचा षड्ज लावला. निराकारात उमटलेला तो दमदार हुंकार अवकाश भेदून श्रोत्यांच्या कानावर आला, आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. झोंबणाऱ्या वाऱ्यांची आणि हाडं गोठवून टाकणाऱ्या थंडीची पर्वा न करता पंडितजी गात होते आणि श्रोते त्या स्वरांमध्ये भिजत होते...

Tales of artists in the music world | गंगेच्या पात्रातील मुलतानी!

गंगेच्या पात्रातील मुलतानी!

Next
ठळक मुद्देप्रत्येक मैफल वेगळी असते आणि मैफलीतील कलाकारही. त्यातले काही किस्से अक्षरश: अजरामर होतात आणि आपल्या मनावर गारुड करतात.

- वंदना अत्रे

पेशावरमध्ये गंगुबाई हनगल यांची मैफल होती. त्यांनी तिथे मैफल करावी अशी पाकिस्तान रेडिओ स्टेशनचे पहिले डायरेक्टर जनरल असलेले, रसिक अधिकारी झेड.ए. बुखारी यांची फार मनापासून इच्छा होती. गंगुबाई पोचल्या, एका हॉटेलमध्ये त्यांच्या मुक्कामाची सोय केली होती. अंघोळ करून तयार झाल्यावर आसपासचा परिसर बघावा म्हणून त्या खोलीबाहेर असलेल्या गॅलरीमध्ये येऊन उभ्या राहिल्या, काही क्षणात दोन सुरक्षारक्षक धावत वर आले आणि गंगुबाईना खोलीत बोलावत गॅलरीचे दार बंद केले. पाकिस्तानात स्त्रियांना असे उघड्यावर(?) उभे राहण्याची परवानगी नाही असे त्यांनी त्यांना स्पष्टपणे ऐकवले. तुम्हाला बुरखा घालायला सांगत नाही आहोत तेच फार महत्वाचे असेही सूचकपणे सुचवले! मैफलींसाठी घराबाहेर पडताना ‘नवा दिवस नवा अनुभव’ हे सूत्र मनाशी घेऊनच प्रत्येक कलाकार बाहेर पडत असणार. मैफलीचा रंगमंच, आयोजक आणि समोरचे श्रोते, सगळेच नवे असते तेव्हा तऱ्हेवाईक आयोजक, बिदागी बुडवून पळ काढणारे संयोजक, परदेशात गेल्यावर स्त्री कलाकारांना भलभलत्या नियमांचा बडगा दाखवणारे अधिकारी याचे कितीतरी अनुभव येत राहतात ..! आजचे श्रोते कसे असतील, दिलदार की कलाकाराची परीक्षा बघणारे, हा प्रश्न मैफलीला जाईपर्यंत मनात असतोच...!

श्रुती सडोलीकर यांचे काका पंडित मधुकर सडोलीकर यांच्या एक मैफलीचा किस्सा कितीतरी वर्षांपूर्वी वाचला होता. ते भुर्जीखां साहेबांचे शिष्य. सांगलीमध्ये एका सकाळच्या मैफलीत पंडितजी ‘रामकली’ गात होते. भुर्जीखां साहेब समोरच बसून ऐकत होते. श्रोत्यांकडून मिळणारी दिलखुलास दाद बघून गुरूला शिष्याचा अभिमान वाटत होता तरीही मनात थोडा विषाद होता. अगदी पुढेच बसलेले एक गायक अगदी मक्ख चेहऱ्याने, मानही न हलवता बसले होते...! नंतर स्वतः खांसाहेब गायला बसले. लंकादहन सारंग नावाचा खास राग सुरू केला आणि त्यांना जाणवले साथीला बसलेल्या आपल्या शिष्याला, मधुकर यांना त्यांनी तो शिकवला नव्हता. मोठ्या खुबीने गुरूने पहिल्या पाच-सात मिनिटातच रागाचे चलन आणि स्वरांची ये-जा करण्याच्या पद्धती शिष्याला सांगितल्या. शिष्याने मग ते शिक्षण अशा तऱ्हेने उचलले की ऐकणाऱ्या श्रोत्यांना वाटावे शिष्याने कित्येक वर्ष या रागाचे शिक्षण घेतले असावे...! एका आवर्तनात सम यायला फक्त अर्धी मात्रा उरली होती आणि गुरूला एकदम ठसका लागला. तेव्हा काही कळायच्या आत, शिष्याने विजेच्या वेगाने एक तान घेत अशी झपकन सम गाठली की ते मख्ख बसलेले गायक उत्स्फूर्तपणे ओरडले “क्या बात है...” ! त्यानंतर एकच क्षण मध्ये गेला... संतापी स्वभावाचे भुर्जीखां साहेब समोर ठेवलेली काठी हातात घेऊन उगारत मोठ्याने कडाडले, “ सकाळी माझा मधू एवढा जीव तोडून रामकली गायला तेव्हा एकदाही मान हलली नाही आणि आता वाहवा देतोस...!”

श्रोत्याला असा ‘जाब विचारणारा’ (!) कलाकार एखादाच....! एरवी जे समोर घडेल ते स्वीकारणेच अनेकदा कलाकाराच्या वाट्याला येते.

मैफल सुरू असताना श्रोते आणि रंगमंच यांच्यामधून एक प्रेतयात्रा जाऊ लागली तेव्हा रंगमंचावर हिराबाई नावाची अतिशय संयमी कलाकार बसली होती म्हणून बरे! एका पडक्या विहिरीवर बांधलेला रंगमंच ऐन मैफलीत कोसळून अकाली जगाचा निरोप घेणारी भैरवी म्हणण्याची वेळही त्यांच्यावरच आली...! पण कलाकारांवर अतोनात प्रेम करणाऱ्या रसिकांचे किस्सेही कमी नाहीत..!

पक्का स्मरणात आहे तो भीमसेनजींचा. मैफलीसाठी गंगा नदीच्या पात्रात सुंदर जलरंगमंच उभा केला होता. ऐन गारठ्यात पाच हजाराहून अधिक श्रोते काठावर बसून होते. पंडितजींनी तीन तंबोरे जुळवले, पण वारा इतका तुफान की ते भलभलत्या सुरात वाजू लागले, धड उभे राहिना. पेटीचा स्वरसुद्धा कानापर्यंत येईना. अखेर पंडितजींनी सगळी वाद्यं थांबवली आणि क्षणभरानंतर मुलतानी रागाचा षड्ज लावला. निराकारात उमटलेला तो दमदार हुंकार अवकाश भेदून श्रोत्यांच्या कानावर आला, आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. झोंबणाऱ्या वाऱ्यांची आणि हाडं गोठवून टाकणाऱ्या थंडीची पर्वा न करता पंडितजी गात होते आणि श्रोते त्या स्वरांमध्ये भिजत होते... असे श्रोते मिळण्यासाठी जीव ओवाळून द्यायला पण कलाकार तयार असतात...!

(लेखिका संगीताच्या आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

vratre@gmail.com

Web Title: Tales of artists in the music world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.