न्यूयॉर्कमध्ये पैठणी

By admin | Published: September 17, 2016 12:44 PM2016-09-17T12:44:21+5:302016-09-17T12:44:21+5:30

मध्य प्रदेशातल्या विदिशा गावातली एक मराठमोळी डिझायनर वैशाली शडांगुळे पैठणी आणि खण यांच्यासह आंतरराष्ट्रीय फॅशनच्या रॅम्पवर उतरली. तिच्याशी विशेष गप्पा...

Paithani in New York | न्यूयॉर्कमध्ये पैठणी

न्यूयॉर्कमध्ये पैठणी

Next
>मुलाखत: प्रतिनिधी
 
सठशीत कुंकू, रंगीबेरंगी खण आणि मोराच्या कुईऱ्यांची देखणी नक्षी ल्यालेली पैठणीची डिझाइन्स घेऊन वैशाली पहिल्यांदा लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर मुंबईत उतरली होती..त्यावेळी ते काम पाहून अनेकजण चकित झाले होते. पैठणी थेट रॅम्पवर चालताना पाहून मॉडर्न जगाचे ठरलेले साचेच जरा हलले होते.. त्या घटनेला आता दहा वर्षे होऊन गेली.. आणि इथून सुरू झालेला वैशालीचा प्रवास यंदा थेट न्यू यॉर्क फॅशन वीकपर्यंत पोहचला. गेल्या आठवड्यात ती आपले खास देशी, हातमागावरचे फॅब्रिक आणि डिझाइन्स घेऊन जेव्हा या फॅशन वीकच्या रॅम्पवर उतरली तेव्हा तिचं जाणकारांसह माध्यमांनीही खूप कौतुक केलं.
मध्य प्रदेशातल्या विदिशा शहरातल्या या मराठमोळ्या डिझायनरची ही झेप नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि वेगळीही. कारण हातमाग आणि त्यावरचे कपडे हे सारं नव्या काळात चिंतेचा विषय बनत असताना, वैशालीसारखे डिझायनर्स त्यांना आंतरराष्ट्रीय रॅम्पपर्यंत नेत आहेत हे महत्त्वाचं आहे.
न्यू यॉर्क फॅशन वीकच्या अनुभवासंदर्भात वैशालीशी झालेल्या या गप्पा..
 
१. न्यू यॉर्क फॅशन वीक? हे कसं घडलं?
- गेले काही दिवस मी न्यू यॉर्क आणि लंडनमधल्या विविध आर्ट शोज्ना, प्रदर्शनांना जात होते. तिथं माझं काम सादर करत होते, लोकांना भेटत होते. माझं काम लोकांना आवडत होतं आणि हे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचलं पाहिजे असंही अनेकजण मला सांगत होते. मला वाटतं हे सारं एकाचवेळी किंवा योग्यवेळी घडत होतं. योगायोगानं याचदम्यान एफटीएल मोडा न्यू यॉर्क फॅशन वीकच्या टीमनं माझ्याशी संपर्क केला. त्यांना माझं काम खूप आवडलं होतं. आणि म्हणून त्यांनी मला या फॅशन वीकमध्ये डायरेक्ट एण्ट्री दिली. नशीब, योग्य वेळी मी योग्य ठिकाणी पोहचले.
 
२. तुला असं वाटतं का, मशीनमधून निघणाऱ्या एकाच साच्याच्या कपड्यांपेक्षा भारतीय कापड आणि हातमागाच्या कपड्यांना जगभरात आता मागणी वाढते आहे, किंवा निदान त्याविषयी जाणून घ्यायला तरी लोक उत्सुक आहेत?
- हो, अर्थातच. आपल्या देशातली वस्त्रसंस्कृती, त्यातलं पारंपरिक ज्ञान, त्यातली कला हे सारं आता आपण अत्यंत अभिमानानं जगासमोर ठेवू लागलोय. अजून आत्मविश्वासानं ठेवायला हवं. जगानं आपल्याला आणि आपल्या वस्त्रकलेला स्वीकारावं अशी अपेक्षा आपण करतो पण ते तसं व्हावं यासाठी आपण ते आधी स्वीकारायला हवं. मला वाटतं आपले स्वत:चे अंदाज, आपल्या मर्यादा आपल्याला तसं करण्यापासून अजून जरा मागे खेचत आहेत. ते बदलायला हवं. 
हातमागावर विणलेल्या कपड्यांची महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातलं बहुविधता, रंगांचं वैविध्य आणि शरीराला होणारा त्या कापडाचा स्पर्श हे सारं मशीनचा कपडा नाही देऊ शकत. मानवी स्पर्शातून येणारी उबदार स्नेहल भावना, त्यातली भावनिक गुंतवणूक हे सारं महत्त्वाचंच आहे. मला वाटतं थोड्याच दिवसात या साऱ्याचं मोल लोकांना कळेल आणि आपल्या हातमागानं विणलेल्या कपड्यांचं जगालाही आकर्षण वाटेल.
३. हॅण्डलूम या एका गोष्टीवर भारतीय कापड व्यवसायाला अधिक प्रगती करता येईल असं वाटतं तुला?
- जागतिक फॅशनच्या जगात भारत आपली एक नवीन मोहोर उमटवू शकेल इतकी ताकद या हातमागात आहेच. आपली शतकानुशतकं चालत आलेली वस्त्रकला आणि सांस्कृतिक, पारंपरिक ज्ञान यातून फॅशनच्या जगात एक नवीन ताकद भारत निर्माण करू शकेल. फक्त योग्य दिशेनं प्रयत्न व्हायला हवेत.
 
४. हातमागाची ही जादू तुझ्या कधी लक्षात आली?
- लहान होते, माझ्या अवतीभोवती सगळी माणसं अशी हातमागावरचेच कपडे घालायची. आईच्या साडीचे शिवलेले फ्रॉक घालून मस्त वाटायचं. हातमागावरच्या त्या साड्या, त्यांचा स्पर्श, आईची ऊब असं सारं जाणवत राहायचं. तेव्हापासून मला या कापडाविषयी प्रेम वाटू लागलं. आणि मग मोठं होता होता या हातमागाची जादू लक्षात आली. २०११ मध्ये लॅक्मे फॅशन वीकमध्ये याच लहानपणाच्या आठवणी सोबत घेऊन मी उतरले होते. आणि मग तिथून माझा हा परंपरेसोबतचा प्रवास सुरू झाला.
 
५. हा न्यू यॉर्क फॅशन वीकचा अनुभव कसा होता?
- मस्त. त्यातही रेश्मा कुरेशी सोबत होती. तिचा आत्मविश्वास, तिच्या वागण्यातलं सौंदर्य आणि त्यातली हिंमत हे सारंच प्रेरणादायी होतं. हे फॅशनचं जग तिला नवीन होतं. पण ज्या ताकदीनं ती रॅम्प चालली ते पाहता सौंदर्य या गोष्टीची व्याख्याच किती ताकदीची आहे हे कुणालाही कळावं.
बाकी माझ्या डिझाइनचं उत्तम स्वागत झालं. मी जगभरातल्या डिझायनर्सना भेटले, कामाची त्यांची समज मी समजून घेतली. आणि एक नवी नजर मलाही लाभली.
 
६. भारतातल्या फॅशन वीकपेक्षा हा अनुभव, हा फॅशन वीक वेगळा होता का? 
- तसा फार फरक नव्हता. फक्त मला वैयक्तिकदृष्ट्या तिथं असलेल्या प्रेक्षकांशी काही संवाद करणं, कनेक्ट राहणं हे सारं वेगळं होतं. ते तुमच्या कामाकडे कसं पाहतात, कसं स्वीकारतात, एका भारतीय डिझायनरविषयी काय ठोकताळे बांधतात हे सारं वेगळं होतं. आणि आंतरराष्ट्रीय रॅम्पवर आपण उतरतो आहोत, याची उत्सकुता तर होतीच.

Web Title: Paithani in New York

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.