शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
4
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
5
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
6
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
7
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
8
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
9
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
10
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
11
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
12
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
13
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
14
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
15
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
16
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
17
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
18
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
19
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
20
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब व म. गांधींच्या मानवी मूल्यांच्या समन्वयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 06:05 IST

गांधीच आपणाला समजावून घेऊ शकतात, अशी बाबासाहेबांची धारणा होती. बाबासाहेब व म. गांधी या दोघांनाही आधुनिक भारत घडवायचा होता. ज्या भारतात गरिबातील गरीब माणसाला हा देश आपला वाटेल. ज्यात ज्येष्ठ आणि कनिष्ठ वर्ग नसेल..

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त...

- बी.व्ही. जोंधळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. गांधी या दोन महामानवांत अस्पृश्यतेच्या प्रश्नावरून घनघोर वैचारिक संघर्ष झाला हे खरे; पण असा वैचारिक संघर्ष करताना या दोन्ही महापुरुषांनी एकमेकांविषयी मनात द्वेष बाळगला नाही, हे विशेष! बाबासाहेब व म. गांधी हे दोघेही आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा, या वादात न अडकता, दोन्ही सुधारणा एकत्रच झाल्या पाहिजेत, असे सांगत होते. अर्थात, तरीही बाबासाहेबांचे प्रथम प्राधान्य सामाजिक सुधारणांनाच होते. असे असूनही या दोन महापुरुषांत संघर्ष झडला तो का? तर बाबासाहेबांनी झगडून मिळविलेल्या स्वतंत्र मतदारसंघास म. गांधींनी प्राणांतिक उपोषण करून केलेल्या विरोधामुळे. अस्पृश्य हे हिंदू समाजाचाच एक भाग असल्यामुळे हिंदू समाजात फूट पडून अस्पृश्य हे अस्पृश्यच राहू नयेत, म्हणून त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देऊ नये, अशी गांधींची भूमिका होती. दुसरे असे की, म. गांधींचा प्रारंभीच्या काळी वर्णव्यवस्थेवर विश्वास होता. गांधीजी पिढीजात व्यवस्थेचेही समर्थन करीत होते. बाबासाहेबांनी यासंदर्भात गांधीजींना पत्र लिहून त्यांच्या असे लक्षात आणून दिले की, ‘महात्मा जन्माने वैश्य आहेत; पण त्यांच्या पूर्वजांनी ब्राह्मणांचा व्यवसाय असलेल्या मंत्रिपदासाठी आपल्या पिढीजात व्यवसायाचा त्याग केला आहे. गांधीजींनी हाती तराजू धरण्याऐवजी वकिलीपेशा स्वीकारला. त्यांच्या लहान मुलाने वैश्य म्हणून जन्म घेऊन ब्राह्मण मुलीशी विवाह केला. काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले, असा प्रश्न विचारतानाच काँग्रेसचा सभासद होण्यासाठी गांधींनी खादीची वगैरे जशी अट घातली, तशी अस्पृश्यता निवारणासाठी एखाद्या अस्पृश्य विद्यार्थ्याला घरी ठेवीन वा त्याला घरी जेवायला बोलवीन वा घरगुती कामासाठी एखादी अस्पृश्य वर्गातील महिलेला काम देईन अशी अट का? घातली नाही, असाही प्रश्न बाबासाहेबांनी गांधींना केला होता.

म. गांधींच्या ‘हरिजन’ साप्ताहिकाच्या पहिल्या अंकासाठी पाठविलेल्या संदेशात बाबासाहेबांनी लिहिले होते, ‘भारतातील बहिष्कृत वर्ग ही जातीसंस्थेची निर्मिती असून, जोपर्यंत या देशात जाती अस्तित्वात आहेत, तोपर्यंत बहिष्कृतवर्गही असेल. या बहिष्कृत वर्गाला मुक्त करावयाचे, तर हिंदू धर्मातील वाईट चालीरीती धुऊन त्यांंना शुद्ध केल्याखेरीज हिंदू धर्माला वाचविता येणार नाही.’ बाबासाहेबांच्या या संदेशाने गांधीजींच्या वर्णाश्रम धर्मावरच घाव घातला. गांधीजींच्या महात्मेपणावर टीका करताना मला मातृभूमी नाही, असे सांगताना राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी राष्ट्र निर्माण व्हावे लागते आणि माणसाला माणुसकीची वागणूक मिळावी लागते, हेच बाबासाहेब गांधीजींना बजावून सांगत होते. बाबासाहेबांच्या अशा घणाघाती टीकेमुळे गांधी अंतर्मुख होत गेले आणि सुताराच्या मुलाने सुतारच व्हावे म्हणणारे गांधी स्वतंत्र भारताचा पहिला राष्ट्रपती सफाई कामगाराचा मुलगा व्हावा आणि आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार करताना आपण त्याच विवाहांना उपस्थित राहू की, वधू-वरापैकी एक जण हरिजन असेल, असे बोलू लागले. अर्थात, ‘हरिजन’ या शब्दावरही बाबासाहेबांनी आक्षेप घेतला. आम्ही हरीची लेकरे आहोत, तर तुम्ही काय दानवाची लेकरे आहात काय, असा जो प्रश्न त्यांनी केला होता, तो रास्तच होता.

येरवडा कारागृहात म. गांधीजींशी झालेल्या भेटीत बाबासाहेबांनी हिंदू मन विवेकाने वागत नाही. आम्हाला मंदिर प्रवेश का नाही, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा गांधींनी मंदिर प्रवेशाला आपण प्राधान्य देतो, असे म्हटले होते. गांधीजींच्या प्रेरणेने केंद्रीय विधिमंडळात मंदिर प्रवेशाचे विधेयक मांडण्यात आले होते; परंतु या विधेयकाला पुजाऱ्यांचा व सनातनी हिंदूंचा विरोध होता.

गांधीच आपणाला समजावून घेऊ शकतात, अशी बाबासाहेबांची धारणा होती. बाबासाहेब व म. गांधी या दोघांनाही आधुनिक भारत घडवायचा होता. ज्या भारतात गरिबातील गरीब माणसाला हा देश आपला वाटेल. ज्यात ज्येष्ठ आणि कनिष्ठ वर्ग नसेल. अस्पृश्यता, धर्मांधता व जातीयतेला स्थान नसेल. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव नि धर्मनिरपेक्ष लोकशाहीची मूल्ये रुजलेली असतील. या पार्श्वभूमीवर विचारवंत, बुद्धिवाद्यांनी पुरोगामी राजकारण्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी गांधी-आंबेडकरांची मानवी मूल्ये समाजात रुजविण्याचे असिधारा व्रत अंगीकारणे हीच बाबासाहेबांना खरी मानवंदना ठरेल.

(लेखक आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत.)